गोवा खबर : गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, मतदार याद्यांमधून तब्बल १ लाख ३९ हजार ६३४ मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप मडगाव गट काँग्रेस कमिटीचे निमंत्रक जे. पी. सावियो कुतिन्हो यांनी केला आहे.
कुतिन्हो यांनी या संदर्भातील पुराव्यांचे कागदपत्रे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपवले असून, याची एक प्रत राहुल गांधी यांच्या कार्यालयातही पाठवली आहे. भाजपच्या बूथ लेव्हल एजंटनी कोणतीही प्रत्यक्ष पडताळणी न करता हरकती नोंदवल्याचे आणि नाव नोंदणीसाठी निवडणूक आयोगाच्या नियमात नसलेला ‘भाडे करार’ मागितला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन डिसेंबर २०२६ पूर्वी नवीन ‘समरी रिव्हिजन’ करण्याची मागणी करण्यात आली आहे.