गोवा खबर : वीजमंत्री तथा मगो पक्षाचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांनी २०२७ ची विधानसभा निवडणूक मडकईऐवजी फोंडा मतदारसंघातून लढवावी, अशी मागणी फोंड्यातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. फोंड्यातील अनेक सक्रिय नागरिकांनी ढवळीकर यांची भेट घेऊन त्यांना फोंड्यातून निवडणूक लढवण्याचा आग्रह केला आहे.
मगो पक्षाचे काम यापूर्वी केतन भाटीकर यांनी फोंड्यात वाढवले होते, मात्र त्यांनी नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. असे असले तरी मगो पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि पाठीराखे अजूनही फोंड्यात सक्रिय आहेत. सुदिन ढवळीकर हे १९९९ पासून मडकईचे प्रतिनिधित्व करत आहेत, परंतु सध्या फोंड्याला स्थानिक आमदार नसल्याने फोंड्याचे अनेक लोक आपल्या कामांसाठी ढवळीकर यांच्याकडेच येतात आणि ते कोणालाही नाराज करत नाहीत.
मगोप आगामी महिन्यात फोंड्यात आपले अधिकृत कार्यालय सुरू करणार असून, त्यानंतर तेथील राजकीय घडामोडींना वेग येईल. मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर हे शिरोडा आणि फोंडा या दोन्ही ठिकाणी पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या मागणीवर राजकीय विश्लेषकांच्या मते सुदिन ढवळीकर लोकांच्या इच्छेला सकारात्मक प्रतिसाद देऊ शकतात, मात्र मगोपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदिन ढवळीकर यांनी अद्याप यावर कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.