गोवा खबर : राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोव्यातील लोकांना ईद-उल-जुहा (बकरी-ईद) निमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, मी गोव्यातील लोकांना विशेषत: मुस्लिम बांधवांना ईद-उल-जुहाच्या (बकरी ईदच्या) हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. ईद-उल-जुहा हा सण भारतात आणि संपूर्ण जगात पारंपारिक भावनेने आणि आनंदाने साजरा केला जातो. बलिदानाचा सण म्हणूनही ओळखला जाणारा हा प्रसंग, आपल्याला श्रद्धा, दानधर्म, निःस्वार्थता आणि मानवता या कालातीत मूल्यांचे पालन करण्याची प्रेरणा देतो. तसेच, तो आपल्याला सर्व धर्म प्रेम, शांतता, करुणा, सलोखा आणि बंधुता या वैश्विक आदर्शांचे समर्थन करीत आहे, याची आठवण करून देतो.
या पवित्र प्रसंगी, आपण शांतता, सलोखा, मित्रता आणि परस्पर सामंजस्याने एकत्र राहण्याच्या आपल्या वचनबद्धतेप्रती पुर्नसमर्पित होऊया. ईद-उल-जुहाचा हा सण सर्व लोकांमध्ये अधिक शांतता, आनंद, समृद्धी आणि एकता घेऊन येवो, असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.