गोवा खबर : गोवा राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत भाजपच्या सहकार विकास मंच गटाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. सहकार भवन संकुलात झालेल्या मतमोजणीत विकास मंचने गोवा राज्य सहकारी संघाच्या बारापैकी आठ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर नवनिर्वाचित संचालकांनी पणजी येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली.
या निवडणुकीत विकास मंचच्या संचालकांमध्ये दीपक गावस, नारायण कामत, फ्रान्सिस फिलिप मास्कारेन्हास, विजयकांत गावकर, रमेश गावस व संजय मांद्रेकर यांचा समावेश आहे. तसेच दामोदर नाईक आणि दिलीप बोरकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. दुसरीकडे, विरोधी गटातून संकेत मुळे, गोविंद नाईक, संदेश मांद्रेकर व मशाल आडपईकर यांनी विजय मिळवला. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर संकेत मुळे व मशाल आडपईकर यांनी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची भेट घेतली.
संकेत मुळे यांनी हा विजय त्यांचे वडील कै. रामचंद्र मुळे यांना समर्पित केला, ज्यांनी अडपई गावात रवळनाथ सोसायटीची स्थापना केली होती. यावेळी बोलताना मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, सहकार क्षेत्रातील पहिले पाऊल म्हणजे गोवा राज्य सहकारी संघ होय. या क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या रामचंद्र मुळे यांचे पुत्र संकेत हे भरघोस मतांनी निवडून आले आहेत. त्यांनी व्हीकेएस सोसायटीतर्फे ही निवडणूक लढवली होती. तसेच मशाल आडपईकर हेही विजयी झाले आहेत. या दोघांनीही सहकार क्षेत्रात चांगले काम करून ते मजबूत करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.