गोवा खबर : विरोधकांकडून सातत्याने वेगवेगळे नॅरेटिव्ह (Narrative) सेट करण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी गोव्याची जनता अत्यंत हुशार असून ती सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून आहे, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले आहे. विरोधकांच्या कोणत्याही खेळीला किंवा राजकीय नाटकांना जनता बळी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दामू नाईक म्हणाले की, विरोधक काय बोलतात किंवा काय करतात यावर मला कोणतीही वैयक्तिक टिप्पणी करायची नाही. ही कदाचित त्यांची राजकीय नाटकेही असू शकतात, जी येणाऱ्या काळात सर्वांसमोर उघड होतील. गोव्यातील लोक राजकारणातील प्रत्येक घडामोड चांगल्या प्रकारे समजून घेतात. कोणामुळे आपल्याला न्याय मिळेल आणि कोण आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकते, याची पूर्ण जाणीव जनतेला आहे.
या वेळी त्यांनी मागील निवडणुकांचे दाखले देत विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, जिल्हा पंचायत किंवा जीसीसीपी (GCCP) च्या निवडणुका असो, विरोधकांनी प्रत्येक वेळी नवीन मुद्दे उपस्थित करून वातावरण फिरवण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी तर ईव्हीएम (EVM) ऐवजी बॅलट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्येही भाजपने स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी शेवटी विजय हा भाजपचाच झाला आहे, असे सांगत विरोधकांचे दावे पुन्हा एकदा फोल ठरतील, असे नाईक यांनी स्पष्ट केले.