गोवा खबर : भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्याबाबत स्पष्टीकरण दिले असून, हा दौरा राजकीय नसून पूर्णपणे वैयक्तिक (Personal Visit) होता, असे त्यांनी सांगितले आहे. काही लोकांकडून या दौऱ्याला उगीचच वेगळे रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रसारमाध्यमांनी नव्याने चर्चेत आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’बाबत आणि त्याचा भाजपवर काही परिणाम होईल का, असा प्रश्न विचारला असता दामू नाईक यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, अशा पक्षांमुळे भारतीय जनता पार्टीला कोणताही फरक पडणार नाही. ही नवी पार्टी केवळ एक विशिष्ट ‘नॅरेटिव्ह’ (Narrative) सेट करण्यासाठी आणि सिस्टीमबद्दल नाराज असलेल्या तरुणांना आकर्षित करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. अशा पक्षांचे तथाकथित फॉलोअर्स कोण आहेत, हे आता हळूहळू समोर येत असून, त्यापैकी काही जण पाकिस्तानातून तर काही संशयास्पद पार्श्वभूमीचे आहेत.
दामू नाईक यांनी पुढे सांगितले की, भारतीय जनता पार्टी हा एका रात्रीत १४ कोटी सदस्यांचा बनलेला पक्ष नाही. पक्षाला जनसंघापासून ते ६ एप्रिल १९८० रोजी स्थापन झालेल्या भाजपपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आजचे यश मिळवण्यासाठी तब्बल ४७ वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष करावा लागला आहे. कार्यकर्त्यांचे समर्पण, लोकांमध्ये जाऊन केलेले काम आणि सातत्यपूर्ण संघर्ष यांमुळेच आज भाजपने जनतेचा अढळ विश्वास संपादन केला आहे आणि हा विश्वास इतक्या सहज डळमळीत होणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.