गोवा खबर

गोवा विधानसभेत एसटी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी भाजप कटिबद्ध : दामू नाईक

Published

on

Spread the love

गोवा खबर :गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकीत अनुसूचित जमाती (ST) समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी पूर्णपणे कटिबद्ध असून, या प्रक्रियेला गती दिली जाईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली आहे. भाजपच्या गाभा समितीच्या (Core Committee) बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

दामू नाईक म्हणाले की, एसटी समाजाला विधानसभेत आरक्षण मिळावे यासाठी आवश्यक असलेले सर्व कायदेशीर सोपस्कार तातडीने पूर्ण केले जातील. यासाठी केंद्रीय मंत्री, गृहमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेऊन चर्चा केली जाईल, तसेच निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर करण्याच्या प्रक्रियेलाही वेग दिला जाईल. २०११ च्या जनगणनेच्या आधारे एसटी समाजाला चार जागा मिळण्याची शक्यता असून, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हे आरक्षण लागू व्हावे, असा पक्षाचा दृढ संकल्प आहे.

या बैठकीत इतरही अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी कार्यकाळाला १२ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल बैठकीत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी आणि आसाममधील पक्षाच्या यशाबद्दल कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात आले. याशिवाय, आगामी शुक्रवारपासून सुरू होणारे जिल्हा प्रशिक्षण वर्ग, ३१ मे रोजी होणारा पंतप्रधानांचा ‘मन की बात’ कार्यक्रम आणि २१ जून रोजी असणारा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ यांसारखे उपक्रम तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे, असे आवाहनही नाईक यांनी या वेळी केले.

Trending

Exit mobile version