गोवा खबर

हुतात्म्यांच्या प्रेरणेने आदिवासी समाजासाठीचा लढा अधिक तीव्र करा : गावडे यांचे आवाहन

Published

on

Spread the love

गोवा खबर : ऐन तारुण्यात समाजाच्या हक्कांसाठी लढताना हुतात्म्य पत्करलेले मंगेष गावकर आणि दिलीप वेळीप हे संपूर्ण आदिवासी समाजाचे खरे प्रेरणास्रोत आणि शौर्याची गाथा आहेत. त्यांच्या पवित्र बलिदानावर केवळ शोक करत बसण्यापेक्षा, त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत असणाऱ्या ‘उटा’ (युनायटेड ट्रायबल्स असोसिएशन अलायन्स) संघटनेचा लढाऊ वारसा आपण सर्वांनी अधिक तेजस्वी ठेवायला हवा, असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार गोविंद गावडे यांनी केले.

केपे येथे आयोजित ‘प्रेरणा दिन’ कार्यक्रमात दीपप्रज्वलन केल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री रमेश तवडकर, सभापती गणेश गावकर व मान्यवर उपस्थित होते.

आमदार गोविंद गावडे पुढे म्हणाले की, गोव्याच्या संपूर्ण इतिहासामध्ये केवळ आपल्या आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी दोन तरुण मुलांना आपले बलिदान द्यावे लागले, ही अत्यंत वेदनादायी आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना आहे. दिलीप वेळीप आणि मंगेष गावकर यांच्या कुटुंबियांकडून आज संपूर्ण समाजाने संयम आणि त्यागाची शिकवण घेण्याची गरज आहे. आमच्या या मुलांचे बलिदान कधीही व्यर्थ जाऊ देता कामा नये, त्यांचे विचार आजच्या तरुण पिढीला नेहमीच प्रेरणा देणारे आहेत. उटा संघटनेच्या स्थापनेला आज २३ वर्षे पूर्ण झाली असून, या संघटनेचा इतिहास हा केवळ विरोधाला विरोध करण्याचा नसून, तो सततचा संघर्ष, त्याग आणि समर्पणाचा इतिहास आहे. हा इतिहास विसरून चालणार नाही, कारण जो समाज आपला इतिहास विसरतो, तो कधीही नवा इतिहास घडवू शकत नाही.

आदिवासी समाजाच्या हक्कांवर गदा आणण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देतानाच गावडे म्हणाले की, गोव्यातील आदिवासी समाजाचा आवाज मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर यांच्या माध्यमातून दिल्लीपर्यंत पोहचावा. उटा संघटना आणि अनुसूचित जमाती समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. हुतात्मा दिलीप वेळीप हे स्वतः सरकारी कर्मचारी होते, हे सांगताना त्यांनी उदय गावकर आणि सुभाष कुटीकर यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव केला. राज्य शासनाने अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेली २,७६९ रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि आदिवासी कल्याण खात्याने घेतलेल्या या पुढाकाराचे कौतुक करताना हा उपक्रम नव्या पिढीला दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

Trending

Exit mobile version