गोवा खबर

वाढीव वीजबिलांचा भार टाकणारा स्मार्ट मीटर प्रकल्प त्वरित रद्द करा, अन्यथा आंदोलन; काँग्रेसचा वीज खात्यावर धडक मोर्चा

Published

on

Spread the love

गोवा खबर : वाढीव वीजबिलांचा नाहक बोजा टाकून सर्वसामान्य गोमंतकीय जनतेचे कंबरडे मोडणारा स्मार्ट मीटर प्रकल्प सरकारने त्वरित रद्द करावा, अन्यथा या विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिला आहे.

काँग्रेसने सोमवारी सकाळी पणजी येथील ‘विद्युत भवन’वर धडक मोर्चा नेऊन वाढीव बिलांच्या मुद्द्यावरून मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस यांना घेराव घातला आणि या विषयावरील मागण्यांचे एक सविस्तर निवेदन त्यांना सुपूर्द केले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अमित पाटकर यांनी स्मार्ट मीटरच्या निविदा प्रक्रियेवर आरोप केले. ते म्हणाले की, या स्मार्ट मीटरच्या निविदा प्रक्रियेत अनेक मोठ्या त्रुटी आहेत. सुरुवातीला ही निविदा ४७६ कोटी रुपयांची होती, मात्र कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक त्यात प्रचंड वाढ करून ती ८९० कोटी रुपये करण्यात आली. ही अतिरिक्त रक्कम नक्की कशासाठी आणि कोणाच्या फायद्यासाठी वाढवली, याचे कोणतेही स्पष्टीकरण सरकारने जनतेला दिलेले नाही. हा सरळसरळ जनतेच्या कष्टाच्या पैशांची उधळपट्टी करण्याचा प्रकार आहे. या स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात वाढीव वीजबिले येण्याची भीती असून, सरकारने ही वादग्रस्त निविदा प्रक्रिया तातडीने रद्द करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे.

दुसरीकडे, काँग्रेसच्या या आरोपांना उत्तर देताना वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी स्मार्ट मीटरचे समर्थन केले आहे. स्मार्ट मीटरमुळे लोकांना वाढीव बिले येतील हा समज पूर्णपणे चुकीचा आणि अफवा पसरवणारा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. उलटपक्षी या प्रकल्पामुळे वीज ग्राहकांना अधिक चांगल्या दर्जाच्या सुविधा आणि अचूकता मिळणार आहे. स्मार्ट मीटरच्या संपूर्ण निविदा प्रक्रियेत कुठल्याही प्रकारची त्रुटी किंवा गैरव्यवहार नसून, त्याला केंद्र सरकारच्या नोडल एजन्सीची रीतसर मान्यता मिळालेली आहे. ही सर्व प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली असून, स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांचा फायदाच होणार असल्याने जनतेने कोणत्याही प्रकारची चिंता करू नये, असे आश्वासन मुख्य अभियंत्यांनी दिले. तर पाटकर यांनी सुचवले की, जर वीज गळती कुठे होते हेच शोधायचे असेल, तर त्यांनी संपूर्ण ट्रान्सफॉर्मरला स्मार्ट मीटर बसवावेत, सर्वसामान्यांच्या घरात नाही.

Trending

Exit mobile version