गोवा खबर: ‘रिव्होल्युशनरी गोअन्स’ (आरजी) हा कोणताही अधिकृत राजकीय पक्ष नसून, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासाठी (मगो) गोव्यात जाणीवपूर्वक त्रासदायक वातावरण निर्माण करणे हाच या पक्षाचा मुख्य हेतू आहे. काही मोठ्या पक्षांनी पडद्यामागून आरजी पक्षाला मुद्दाम प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला आहे, असा आरोप मगोचे नेते तथा राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला आहे. कवळे येथे आयोजित एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मंत्री ढवळीकर पुढे म्हणाले की, आरजी पक्षाचे खरे स्वरूप आता जनतेसमोर पूर्णपणे उघडे पडले आहे. कोणीतरी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने या पक्षाला गोव्यात आणले असून मतदारांनी आता याची सखोल चौकशी करायला हवी. सुदिन ढवळीकर यांचे मताधिक्य कसे घटवायचे, दीपक ढवळीकर व डॉ. केतन भाटीकर यांना कशा प्रकारे पराभूत करता येईल, याच एका सुप्त हेतूने या विरोधकांनी काम केले. एरवी कोणताही राजकीय पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी मैदानात उतरतो; मात्र हा पक्ष केवळ ‘मगो’ला सतत सतावण्यासाठी आणि त्याचे नुकसान करण्यासाठीच जन्माला आला आहे. यापुढे गोव्यात आरजी पक्षाला कोणतेही भवितव्य उरलेले नाही, आणि ‘आम आदमी पक्ष’ (आप) सुद्धा आज त्याच चुकीच्या मार्गाने चालला असल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजपसोबतच्या युती संदर्भात बोलताना ढवळीकर म्हणाले की, मगो-भाजपा युतीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केले होते. ही युती प्रक्रिया सुरू असताना महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आमच्यासोबत उपस्थित होते. त्यामुळे आगामी निवडणुकीतही ही युती अशीच कायम राहणार असून, दिलेल्या शब्दाचा मान भाजप नक्कीच राखेल असा पूर्ण विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आगामी काळात नक्की किती जागा लढवायच्या हे अद्याप ठरलेले नसून, त्यासाठी संपूर्ण सर्वेक्षण केले जाईल व निवडून येण्याची क्षमता हाच एकमेव निकष लावून मगो व भाजप मिळून योग्य वेळी निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, फोंडा मतदारसंघ हा पारंपारिकरीत्या मगोचाच बालेकिल्ला राहिला असून, काही महिन्यांतच फोंड्यात मध्यवर्ती ठिकाणी मगोचे सुसज्ज कार्यालय सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
विधानसभेच्या निवडणुका आता अवघ्या आठ महिन्यांवर आल्या असल्याने जनतेने व मतदारांनी अशा संधीसाधू लोकांपासून अत्यंत सावध राहायला हवे, असे आवाहन ढवळीकर यांनी केले. राज्यात विकासकामे होत असताना केवळ नकारात्मक राजकारण करणाऱ्या लोकांना त्यांची खरी जागा दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. तोंडी मुजोर भाषा असणाऱ्या अशा पक्षांपासून तरुणांनी लांब राहिले पाहिजे, कारण या लोकांनी उंडिर येथील मलमूत्र निस्सारण प्रकल्पासारखे जनोपयोगी प्रकल्प बंद पाडण्यासाठी मेाठा प्रयत्न केला. वीरेश बोरकर यांनी तिथे आपल्या लोकांना सोबत घेऊन काम बंद पाडले, जे आजतागायत बंदच आहे. त्यामुळे सरकारमधील प्रत्येक घटकाने अशा समाजघातक प्रवृत्तींविरुद्ध तातडीने कठोर उपाययोजना करायला हवी, अशी मागणीही सुदिन ढवळीकर यांनी केली.