गोवा खबर

एसटी समाजाला २०२७ च्या निवडणुकीतच राजकीय आरक्षण मिळणार : मुख्यमंत्री सावंत यांची घोषणा

Published

on

Spread the love

गोवा खबर: ‘अनुसूचित जमाती (ST) समाजाला राजकीय आरक्षण मिळवून देण्याची पूर्ण जबाबदारी भाजप सरकारने घेतली असून, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत हे आरक्षण लागू व्हावे यासाठी १०० टक्के प्रयत्न केले जातील,’ अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे.

आंबावली-केपे येथे आयोजित आदिवासी कल्याण खात्याच्या ‘प्रेरणा दिन’ कार्यक्रमात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर, माजी मंत्री व आमदार गोविंद गावडे, उटा (UTA) अध्यक्ष प्रकाश वेळीप यांच्यासह एसटी समाजाचे सर्व प्रमुख नेते पहिल्यांदाच एकत्र आले होते. प्रेरणा दिनानिमित्त या सर्व नेत्यांनी समाजहितासाठी संघटित राहण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमात डॉ. मधु घोडकिरेकर यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांची भाषणे आणि महत्त्वाचे मुद्दे :

  • भाजपनेच मागण्या केल्या पूर्ण: गोव्यातील एसटी समाजाला ‘एसटी’चा दर्जा देण्याचे काम केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाजप सरकारने केले. तसेच राज्यात आदिवासी कल्याण खाते, आदिवासी आयोग आणि एसटी महामंडळ उभारण्याचे सर्व काम स्व. मनोहर पर्रीकर यांच्या भाजप सरकारनेच पूर्ण केले, याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली.
  • ‘एसटी’ची नोकरभरती याच वर्षी: सरकारी विभागांमध्ये कोणती आणि किती एसटी संवर्गातील पदे रिक्त आहेत, याची माहिती घेऊन २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच या सर्व पदांची भरती प्रक्रिया सुरू केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

आरक्षणाशिवायही समाज लढेल आणि जिंकेल : गोविंद गावडे

माजी मंत्री तथा आमदार गोविंद गावडे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री डॉ. सावंत हे राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि त्यात ते यशस्वी होतील. परंतु, काही कारणास्तव २०२७ पर्यंत जर हे आरक्षण मिळाले नाही, तरीही आरक्षणाच्या हुसकावणीशिवाय आपला समाज कोणत्याही परिस्थितीशी लढेल आणि निवडणूक जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तवडकर भावूक; घेतली महत्त्वाची शपथ

आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर हे स्वागतपर भाषण करताना अत्यंत भावूक झाले. आजवर एसटी समाजासाठी योगदान दिलेल्या सर्व नेत्यांचे त्यांनी आभार मानले. पुढे बोलताना, ‘आपल्या पदाचा वापर करताना कधीही कुणालाही त्रास देणार नाही,’ अशी जाहीर शपथ त्यांनी घेतली.

तसेच भूतकाळातील ‘उटा’ आंदोलनाची आठवण काढताना ते म्हणाले की, “या आंदोलनात आपण दोन तरुण गमावले. शांततापूर्ण आंदोलन संपवून परतत असताना एका जमावाने आपल्यावर जीवघेणा हल्ला केला होता. ते आपल्याला जिवंत मारणार होते, पण काही पत्रकार बांधवांमुळे माझा जीव वाचला. अन्यथा त्या आंदोलनात पहिला बळी माझाच गेला असता.”

Trending

Exit mobile version