गोवा खबर

गोव्यात इंधन वितरण सुरळीत सुरू असल्याची तेल विपणन कंपन्यांची माहिती

Published

on

Spread the love

गोवा खबर : तेल आणि वायू क्षेत्रावर परिणाम करणाऱ्या सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही, संपूर्ण गोव्यात पेट्रोल, डिझेल आणि लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) चा पुरवठा आणि वितरण अखंडितपणे सुरू असल्याचे सांगून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांसह सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी नागरिकांना आश्वस्त केले आहे.

तेल विपणन कंपन्यांनी जारी केलेल्या संयुक्त प्रसिद्धीपत्रकानुसार, राज्यातील टर्मिनल्स, डेपो, एलपीजी बॉटलिंग प्लांट्स आणि किरकोळ विक्री केंद्रांच्या आपल्या विस्तृत नेटवर्कद्वारे इंधनाची अखंड उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी तेल उद्योग पूर्णपणे सज्ज आहे.

सर्व किरकोळ विक्री केंद्रांवर इंधन वितरणाचे काम सुरळीतपणे सुरू आहे आणि विहित सुरक्षा आणि परिचालनविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोणत्याही निर्बंधांशिवाय पुरवठा केला जात आहे, असे या कंपन्यांनी सांगितले आहे.

संपूर्ण पुरवठा साखळीमध्ये पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि ग्राहकांची वास्तविक मागणी कार्यक्षमतेने पूर्ण करण्यासाठी साठा पुनर्भरणाचे काम सातत्याने केले जात आहे, असे तेल विपणन कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.

घरगुती ग्राहकांना होणारा एलपीजीचा पुरवठा देखील नेहमीसारखा राखला जात असून, संपूर्ण गोव्यात सिलिंडरचे वितरण सुरळीतपणे सुरू आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.

नागरिकांना अखंड ऊर्जा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी लॉजिस्टिक्स, स्टॉक पोझिशनिंग आणि वितरण नियोजनाबाबत अतिशय काटेकोरपणे समन्वय राखला जात असल्याची माहिती तेल विपणन कंपन्यांनी दिली. इंधन पुरवठ्याची एकंदर परिस्थिती स्थिर असून त्यावर सतत देखरेख ठेवली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

नागरिकांना त्यांच्या खरेदीची पद्धतसर्वसामान्य राखण्याचे आणि विनाकारण घाबरून खरेदी करणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इंधनाच्या उपलब्धतेबाबत विश्वसनीय आणि पडताळणी केलेल्या माहितीसाठी जनतेने केवळ कंपन्या आणि सरकारी प्राधिकरणांद्वारे जारी केलेल्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असा सल्लाही देण्यात आला आहे.

Trending

Exit mobile version