गोवा खबर

गोव्यात मोबाईल ॲप्लीकेशनद्वारे जनगणना 2027 मधील गृहसूचीकरण कामाचा (एचएलओ) पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा येथे 16 एप्रिल 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यातील घरांच्या याद्या करण्याचे काम (एचएलओ) यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. तंत्रज्ञान-चलित जनगणना परिचालनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, समर्पित ॲप्लीकेशन-आधारित डिजिटल मंचाचा वापर करत राज्यभरात अत्यंत कार्यक्षमतेने हे कार्य पूर्ण करण्यात आले.

घरांच्या याद्यांच्या कामामध्ये गोवा राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील घरे, कुटुंबे तसेच त्यांच्याशी संबंधित सुविधा यांच्या व्यापक गणनेचा समावेश होता.

प्रगणक आणि पर्यवेक्षकांनी हे काम वेळेवर पूर्ण होईल याची सुनिश्चिती करत अत्यंत निष्ठेने तसेच व्यावसायिकपणे हे काम पार पाडले. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना संबंधित डिजिटल ॲप्लीकेशन तसेच कामाच्या पद्धतींशी ओळख करून देण्याच्या उद्देशाने सदर काम सुरु होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मोबाईल ॲप-आधारित एचएलओच्या यशस्वी अंमलबजावणीतून डिजिटल तंत्रज्ञान, पारदर्शकता तसेच कार्यक्षम माहिती व्यवस्थापन यंत्रणांच्या माध्यमातून जणगणनेच्या प्रक्रियेला आधुनिक स्वरूप देण्याप्रती सरकारची कटिबद्धता दिसून येते.

या कामासाठी गोव्यातील जनतेने दिलेले सक्रीय सहकार्य तसेच घरांच्या याद्या करण्याच्या कार्याला दिलेले पाठबळ याबद्दल गोव्याच्या जनगणना कार्य संचालनालयाने जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. सदर कार्य सुरळीतपणे पार पडण्याची सुनिश्चिती व्हावी म्हणून ज्यांच्या समन्वयीत प्रयत्नांनी हे काम साध्य झाले ते सर्व प्रगणक, पर्यवेक्षक, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, स्थानिक संस्था तसेच इतर भागधारकांचे देखील कौतुक करण्यात आले आहे.

या टप्प्यामध्ये संकलित करण्यात आलेल्या माहितीतून नियोजन, प्रशासन, पायाभूत सुविधा विकास तसेच कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी यांच्यासाठी महत्त्वपूर्ण सांख्यिकीय पाया तयार होईल.

जनगणना 2027 मधील पुढच्या टप्प्याची म्हणजेच लोकसंख्येच्या गणनेची तयारी सुरु असून त्याविषयीचे अधिक तपशील स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील.

Trending

Exit mobile version