आरजीच्या सांतआंद्रे गटाचा दावा; केंद्रीय समितीच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप
गोवा खबर : रिव्होल्युशनरी गोअन्स (आरजी) पक्षाचे एकमेव आमदार वीरेश बोरकर हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. मात्र, या सर्व चर्चा पूर्णपणे तथ्यहीन असून आमदार बोरकर काँग्रेसमध्ये जाणार नाहीत, असा दावा आरजी पक्षाच्या सांतआंद्रे गटाचे नेते तुषार गावेस यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे.
वीरेश बोरकर यांनी असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे स्पष्ट करताना गावेस म्हणाले की, जर त्यांनी भविष्यात कधी काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार केला, तर आम्ही स्वतः त्यांच्याकडून याविषयी नक्कीच स्पष्टीकरण मागू.
विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने आरजी पक्षात जाणीवपूर्वक फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोपही यावेळी करण्यात आला. पक्षाची केंद्रीय समिती सध्या ज्या पद्धतीने काम करत आहे, त्याविषयी सांतआंद्रे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाला बंद करण्याबाबत केंद्रीय समितीच्या बैठकीत चर्चा झाल्याचे आमच्या कानावर आले आहे, जर खरोखरच असा काही प्रकार घडला असेल, तर पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात का घेतले गेले नाही, असा थेट सवाल तुषार गावस यांनी उपस्थित केला आहे. गेल्या एक महिन्यापासून आमदार वीरेश बोरकर यांच्यावर पक्षांतर्गत विविध आरोप केले जात आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते हा त्रास सहन करत असूनही त्यांनी सांतआंद्रेमधील लोकांसाठीचे आपले काम अविरतपणे सुरू ठेवले आहे. पक्षाच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना त्यांच्या या कामाची आणि कष्टाची अजिबात कदर नाही, हे अत्यंत दुःखद आहे.
केंद्रीय समितीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करताना तुषार गावेस पुढे म्हणाले की, गोमंतकीयांनी या संपूर्ण प्रकरणाची केवळ एकच बाजू पाहू नये. आमदार वीरेश बोरकर यांना पक्षाने थेट ‘कारण दाखवा’ नोटीस बजावली, त्याऐवजी सांतआंद्रे गटाच्या स्थानिक अधिकाऱ्यांची बाजू आधी ऐकून घेणे आवश्यक होते. पक्षातील काही मोजके लोकच वीरेश बोरकर काँग्रेसमध्ये जात असल्याच्या खोट्या बातम्या पसरवत आहेत. वीरेश बोरकर हे पक्षाकडून डोनेशन घेतात किंवा त्यांच्या मालमत्तेबाबत जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, ते दुर्दैवी आहेत. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय आमदारावर असे आरोप केले जात आहेत. गेल्या २५ वर्षांपासून ज्या सांतआंद्रे मतदारसंघाचा विकास रखडला होता, तो विकास या आमदाराने अवघ्या काही वर्षांत साधून दाखवला आहे, तरीही त्यांना दोष दिला जात आहे. या संपूर्ण विषयावर आमदार वीरेश बोरकर स्वतः योग्य वेळी जाहीरपणे आपली भूमिका मांडतील, असा विश्वास गावेस यांनी व्यक्त केला.