गोवा खबर

बिट्समधील विद्यार्थी आत्महत्या प्रकरण सीबीआयाकडे द्या : अभाविप

Published

on

Spread the love

संस्थेतील वाढत्या घटनांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा निषेध; निष्पक्ष चौकशीची मागणी

गोवा खबर : बिन्ट्स पिलानी (BITS Pilani) गोवा कॅम्पससारख्या देशातील अत्यंत नामांकित आणि प्रतिष्ठित शिक्षण संस्थेमध्ये गेल्या काही काळापासून घडत असलेल्या घटनांनी राज्यभरात चिंतेचे वातावरण आहे. गेल्या काही महिन्यांत तब्बल ७ विद्यार्थ्यांनी मानसिक तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि वेदनादायी मालिका समोर आली आहे. या अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरणाची दखल घेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) यावर निषेध नोंदवला आहे.

या सर्व घटनांची अत्यंत निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, यासाठी हे प्रकरण तात्काळ केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात यावे, अशी अधिकृत मागणी अभाविपने शिक्षण खात्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

अभाविपने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, संस्थेच्या आवारात घडणाऱ्या या दुर्दैवी आत्महत्यांमागे केवळ शैक्षणिक ताणतणाव हे एकमेव कारण नसून, यामागे अमली पदार्थांचे (ड्रग्ज) सेवन, कौटुंबिक समस्या, मानसिक आरोग्याकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष आणि संस्था प्रशासनाचे अंतर्गत व्यवस्थापन हाताळण्यात आलेले अपयश अशी अनेक गंभीर कारणे असल्याचे दिसून येत आहे.

असे अत्यंत गंभीर वातावरण असतानाही, स्थानिक पोलीस यंत्रणा आणि संस्था प्रशासन या आत्महत्यांच्या मूळ कारणांचा शोध न घेता, ही प्रकरणे घाईघाईने बंद करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय निर्माण होत आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे, असे अभाविपने म्हटले आहे.

अभाविपच्या प्रमुख मागण्या: १. कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि संस्थेमधील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी, शिक्षण खात्याने या सातही विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणांची सखोल चौकशी सीबीआय (CBI) मार्फत करावी. २. या सर्व प्रकरणांचा सविस्तर अभ्यास करून कॅम्पसमधील सद्य वातावरण, विद्यार्थ्यांवर असणारा अंतर्गत दबाव आणि प्रशासकीय त्रुटी यावर प्रशासनाने एक अधिकृत ‘स्टेटस रिपोर्ट’ (स्थिती अहवाल) जाहीर करावा. तसेच, संस्थेमध्ये स्वतंत्र मानसोपचार तज्ज्ञांची (Psychiatrists) नियुक्ती करून, विद्यार्थ्यांसाठी २४ तास कार्यरत असणारी प्रभावी हेल्पलाइन सुरू करण्यात यावी, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याला मानसिक दबावाखाली टोकाचे पाऊल उचलावे लागणार नाही.

Trending

Exit mobile version