गोवा खबर

जनतेच्या अपेक्षा भाजपच पूर्ण करणार : मंत्री राणे

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यातील जनतेच्या सर्व अपेक्षा राज्यातील भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकारच पूर्ण करेल. त्यामुळे लोकांनी नेहमी भाजप सरकारसोबत ठामपणे उभे राहावे. आपण सर्वांनी मिळून पुन्हा एकदा राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आणूया, असे आवाहन राज्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी काल केले.

वाळपई मतदारसंघातील नगरगाव पंचायत क्षेत्रात काल, सोमवारी मंत्री राणे यांच्या उपस्थितीत एका जाहीर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत त्यांनी स्थानिक जनतेशी थेट संवाद साधत त्यांच्या विविध समस्या आणि प्रश्न जाणून घेतले. नगरगाव येथील शांतादुर्गा मंदिर सभागृहात ही बैठक पार पडली, ज्याला मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

राणे म्हणाले की, आमचे सरकार ‘प्रशासन जनतेच्या दारी’ आणून लोकांचे वैयक्तिक आणि सार्वजनिक प्रश्न जागेवरच सोडवत आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असून, यापुढेही लोकांची सेवा अविरतपणे करत राहणार आहोत.

बैठकीतील मुद्दे : आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही नगरगाव आणि सत्तरीतील जनतेने भाजपलाच पूर्ण साथ द्यावी. लोकांच्या कल्याणासाठी आम्ही सातत्याने काम करत राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वाळपई पालिका क्षेत्रात आणि इतर भागांतही अशाच प्रकारच्या बैठका घेऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या जातील, असे राणे यांनी स्पष्ट केले.

राजकारणात आपण केवळ लोककल्याणासाठीच आलो आहोत, हे अधोरेखित करताना मंत्री राणे म्हणाले की, त्यांच्या वडिलांनी (प्रतापसिंह राणे) वर्षानुवर्षे सत्तरी तालुक्याची प्रामाणिकपणे सेवा केली आहे आणि तोच वारसा पुढे चालवत आपणही लोकसेवेत स्वतःला वाहून घेतले आहे. काही वेळा लोकांचे प्रश्न सोडवताना कायदेशीर किंवा तांत्रिक कारणांमुळे विलंब लागत असला, तरी आम्ही त्यावर नक्कीच तोडगा काढतो. लोकांना जेव्हा जेव्हा संकट येते, तेव्हा आम्ही मदतीसाठी धावून जातो. भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली राज्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या जात असून, भविष्यात आणखी रोजगार उपलब्ध करून दिले जातील, मात्र त्यासाठी जनतेने कायम भाजपसोबत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

Trending

Exit mobile version