गोवा खबर

सिद्धकला अकादमीचा नृत्य महोत्सव कला अकादमीत उत्साहात साजरा

Published

on

Spread the love

राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांच्या हस्ते उद्घाटन; डॉ. प्रवीण गावकर, दीपक नार्वेकर यांची उपस्थिती

गोवा खबर : जान्हवी बोंद्रे आयोजित सिद्धकला नृत्यसंस्थेचा वार्षिक नृत्य महोत्सव कला अकादमी, पणजी येथे मोठ्या उत्साहात व सांस्कृतिक वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर प्रख्यात कलाकार डॉ. प्रवीण गावकर, गोवा पर्यटन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक (विपणन) दीपक नार्वेकर, तसेच सिद्धकला नृत्यसंस्थेच्या संचालिका गुरु जान्हवी बोंद्रे व जयेश बोंद्रे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात भरतनाट्यम व शास्त्रीय नृत्याचे मनोहारी सादरीकरण सिद्धकलाच्या कलाकारांनी केले. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या भरतनाट्यम परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ‘श्री गणेश कौतुकम’, ‘शिव आराधना’, ‘देवी स्तुती’ या नृत्यरचनांनी रसिकांची मने जिंकली.

राज्यसभा खासदार सदानंद तानावडे म्हणाले: “गोव्याची सांस्कृतिक ओळख जपण्याचे व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम सिद्धकला अकादमी सारख्या संस्था करीत आहेत, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. शास्त्रीय कला हीच आपली खरी संपत्ती आहे. अशा महोत्सवांमुळे गोव्यातील पर्यटनाला सांस्कृतिक आयाम मिळतो. जान्हवी व जयेश बोंद्रे यांचे कलाप्रसाराचे कार्य युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे.”

डॉ. प्रवीण गावकर यांनी आपल्या भाषणात सिद्धकला नृत्य अकादमीच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले व कलासाधनेतील सातत्याचे महत्त्व विशद केले.

गोवा पर्यटन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक दीपक नार्वेकर म्हणाले: “गोवा समृद्ध पारंपरिक कला आणि सांस्कृतिक वारशासाठीही ओळखला जातो. गोवा अध्यात्मासाठीदेखील प्रसिद्ध आहे. सिद्धकलाचा नृत्य महोत्सव हा ‘सांस्कृतिक पर्यटना’चे उत्तम उदाहरण आहे. भरतनाट्यम परदेशातही प्रसिद्ध आहे आणि तेथील लोकांना अशा भारतीय सादरीकरणांची विशेष आवड आहे.”

गुरु जान्हवी बोंद्रे यांनी आपल्या भाषणात सर्वांनी सिद्धकला नृत्य अकादमीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले व अभिनंदन केले. “सिद्धकला नृत्य अकादमी सदैव विद्यार्थ्यांना नृत्य शिकवेल व त्यांचे सर्वत्र कार्यक्रम आयोजित करेल,” असे त्या म्हणाल्या. जयेश बोंद्रे यांनी सर्वांचे ऋणनिर्देश व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रासाठी भरतनाट्यम शिक्षिका सचिका अल्मेदा शर्मा व ज्येष्ठ कलाकार नितीन कोरगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दोघांनीही सिद्धकला नृत्य संस्थेचे आपली कला व संस्कृती जपण्यासाठी आणि शास्त्रीय नृत्यातील उदयोन्मुख कलाकारांना संधी देण्यासाठी विशेष अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती हजारे यांनी सुंदर पद्धतीने केले. मोठ्या संख्येने उपस्थित रसिक प्रेक्षकांनी कलाकारांचे टाळ्यांच्या गजरात कौतुक केले.

तद्नंतर सिद्धकला नृत्य अकादमीच्या विद्यार्थ्यांनी अनेक नृत्ये सादर करून रसिकांची मने जिंकली.
सिद्धकला नृत्य अकादमी गेली २४ वर्षे कार्यरत असून गुरु जान्हवी बोंद्रे यांनी शास्त्रीय नृत्यात अनेक तरुण-तरुणींना प्रशिक्षित केले आहे. त्या विद्यार्थ्यांना गोव्यात व राष्ट्रीय स्तरावर वेळोवेळी मंच उपलब्ध करून देतात.

Trending

Exit mobile version