गोवा खबर

म्हार्दोळ येथील राज्यस्तरीय मंदिर परिषदेला सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामीजींचे शुभाशीर्वाद

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोमंतक मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा ३१ मे रोजी म्हार्दोळ येथील श्री महालसा संस्थानच्या सिंहपुरुष सभागृहात राज्यस्तरीय एक दिवसीय मंदिर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६.३० या वेळेत होणाऱ्या या परिषदेच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून गोमंतक मंदिर महासंघाच्या प्रतिनिधींनी नुकतीच श्रीक्षेत्र तपोभूमी येथे ब्रह्मेशानंद आचार्य स्वामी यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान स्वामीजींनी आगामी ‘राज्यस्तरीय मंदिर परिषद-२०२६’ला आपले मौल्यवान शुभाशीर्वाद दिले. या प्रसंगी गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी, विशाखा, सूजन नाईक आणि स्नेहलता प्रामुख्याने उपस्थित होते.

या भेटीदरम्यान सद्गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजी यांनी गोमंतक मंदिर महासंघातर्फे चालणाऱ्या मंदिर सुव्यवस्थापन आणि मंदिर संस्कृती रक्षणाच्या कार्याविषयी, तसेच आगामी परिषदेच्या नियोजनाविषयी अत्यंत आपुलकीने माहिती जाणून घेतली. मंदिर संस्कृती रक्षणाचे हे पवित्र कार्य यापुढील काळात अधिक संघटितपणे आणि वेगाने पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त करत स्वामीजींनी महासंघाला आशीर्वाद दिला. दुसरीकडे, मंदिर महासंघाच्या स्थापनेच्या सुरुवातीच्या काळापासून ते आतापर्यंत म्हणजेच संपूर्ण एक तप (१२ वर्षे) या कार्यास स्वामीजींचे सातत्याने मोलाचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले आहेत. या निरंतर पाठिंब्याबद्दल मंदिर महासंघाच्या वतीने स्वामीजींच्या चरणी अत्यंत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

Trending

Exit mobile version