गोवा खबर : सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर देशाला आध्यात्मिक बळ देण्याच्या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने येत्या रविवारी, १७ मे २०२६ रोजी मुंबईत ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले आहे. प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या मागील नर्दुल्ला टँक मैदानावर दुपारी ३.३० ते सायं. ७.३० या वेळेत हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांनी मुंबई मराठी पत्रकार संघातील पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस, पुरोहित अन् ज्योतिर्विद श्रेयस पिसोळकर आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे नवी मुंबई समन्वयक कैलास पाटील उपस्थित होते.
हा महायज्ञ केवळ धार्मिक विधी नसून तो राष्ट्ररक्षणाचा एक आध्यात्मिक लढा असल्याचे अभय वर्तक यांनी यावेळी नमूद केले. देवी मातंगी ही आदिशक्तीची ‘प्रधानमंत्री’ मानली जाते आणि शत्रूवर विजय मिळवण्यासाठी तिची उपासना अत्यंत प्रभावी ठरते. प्रभू श्रीरामाच्या काळातही या देवीचे तत्त्व कार्यरत होते, असे ऐतिहासिक दाखले देत भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि ‘रामराज्या’च्या संकल्पपूर्तीसाठी हा यज्ञ केला जात आहे.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे १००० वर्षांपूर्वी महंमद गझनीने भग्न केलेल्या सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशांचे भाविकांना दर्शन घेता येणार आहे, असे चेतन राजहंस यांनी सांगितले. यज्ञाचे पौरोहित्य तामिळनाडूतील आगमाचार्य अरुणकुमार गुरुमूर्ती करणार असून शिवाचार्य गुरुमूर्ती हे मुख्य आचार्य म्हणून कार्य पाहणार असल्याची माहिती श्रेयस पिसोळकर यांनी दिली. या कार्यक्रमाला मुंबईसह परिसरातील विविध जिल्ह्यांतील मंदिरांचे विश्वस्त आणि पुजारी उपस्थित राहतील, असे कैलास पाटील यांनी स्पष्ट केले.
सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या ऐतिहासिक यज्ञाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, संत आणि सुमारे ५ हजार भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सर्व धर्मप्रेमी हिंदूंनी या मंगलमय सोहळ्याला सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन अभय वर्तक यांनी केले आहे.