गोवा खबर

१६ मे हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून घोषित करा; हिंदू एकता मंचची गोवा सरकारकडे मागणी

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्याच्या इतिहासातील १६ मे १५४६ हा दिवस अत्यंत वेदनादायी आणि एका काळ्या अध्यायाची सुरुवात करणारा मानला जातो. याच दिवशी फ्रान्सिस झेविअर याने पोर्तुगालचा राजा जॉन-३ याला पत्र लिहून गोव्यात ‘इन्क्विझिशन’ म्हणजेच धर्मन्यायालय स्थापन करण्याची मागणी केली होती. या घटनेचे ऐतिहासिक गांभीर्य लक्षात घेऊन गोवा सरकारने १६ मे हा दिवस अधिकृतपणे ‘काळा दिवस’ म्हणून घोषित करावा, अशी आग्रही मागणी ‘हिंदू एकता मंच, गोवा’ या संघटनेने केली आहे.

पणजी येथील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली. यावेळी नितीन फळदेसाई, सत्यविजय नाईक, जयेश थळी, सुजन नाईक, अभय सामंत आणि दिनीन पेडणेकर यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, उपलब्ध ऐतिहासिक दस्तऐवज आणि संशोधनानुसार गोव्यातील इन्क्विझिशनचा काळ हा हिंदू समाजासाठी अत्यंत दडपशाहीचा होता. या काळात हजारो हिंदूंवर अमानुष धार्मिक अत्याचार करण्यात आले, अनेक हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली गेली आणि हिंदूंच्या धार्मिक परंपरांवर बंदी घालून सक्तीने धर्मांतर घडवून आणले गेले. इतिहासकारांनीही आपल्या लिखाणामध्ये त्या काळातील अत्याचारांचा उल्लेख सविस्तरपणे केलेला आहे. विशेषतः इतिहासकार अनंत काकबा प्रियोळकर यांनी त्यांच्या ‘द इन्क्विझिशन’ या ग्रंथात इन्क्विझिशनमधील अमानुष शिक्षा आणि धार्मिक दडपशाहीचे विस्तृत वर्णन केले आहे. तसेच फ्रेंच वैद्य आणि प्रवासी चार्लस डेलोन यांनी स्वतः गोवा इन्क्विझिशनचा अनुभव घेतला असून त्यांच्या लिखाणातही त्या काळातील अत्याचारांचे वर्णन आढळते.

या पार्श्वभूमीवर हिंदू एकता मंचने सरकारकडे अनेक मागण्या मांडल्या आहेत. १६ मे हा दिवस ‘गोव्याच्या इतिहासातील काळा दिवस’ म्हणून अधिकृतपणे घोषित करावा आणि गोवा इन्क्विझिशनचा सत्य इतिहास शालेय तसेच महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करावा, जेणेकरून पुढील पिढीला खरी माहिती मिळेल. तसेच, गोव्यात उद्ध्वस्त झालेली मंदिरे आणि पीडित हिंदू समाजाचा इतिहास सार्वजनिकरीत्या मांडण्यासाठी ‘गोवा इन्क्विझिशन’ संग्रहालयाची स्थापना करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, इन्क्विझिशनच्या काळात झालेल्या अन्यायाबद्दल पोपने गोमंतकीय हिंदूंची जाहीर माफी मागावी, असेही मंचाने नमूद केले आहे.

मंचाने गोव्यातील राष्ट्रभक्त नागरिकांनाही या मागणीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. येत्या १६ मे रोजी सर्व नागरिकांनी अंगावर काळी पट्टी बांधून किंवा काळे वस्त्र परिधान करून या ऐतिहासिक घटनेचा निषेध नोंदवावा. तसेच, सोशल मीडियावरील आपले प्रोफाइल पिक्चर (DP) काळ्या रंगाचे ठेवून आणि समाजमाध्यमांच्या आधारे गोवा इन्क्विझिशनचा सत्य इतिहास जनतेपर्यंत पोहोचवून या अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, असे आवाहन संघटनेने केले आहे. इतिहास दडपून समाजात खरा सलोखा निर्माण होऊ शकत नाही, त्यामुळे सत्य इतिहास स्वीकारणे हीच न्यायाची खरी पायरी आहे, असे मत मंचाने व्यक्त केले आहे.

Trending

Exit mobile version