गोवा खबर : जगभरात सध्या युद्धजन्य परिस्थिती आणि आर्थिक अस्थिरता असतानाही केंद्र सरकारच्या प्रभावी नियोजनामुळे भारतातील सामान्य जनतेला कोणत्याही टंचाईचा सामना करावा लागलेला नाही. असे असतानाही काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष या विषयावर राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते *यतीश नाईक यांनी केला आहे.
पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध आकडेवारी सादर करत युपीए सरकार आणि विद्यमान मोदी सरकार यांच्यातील कार्यक्षमतेची तुलना केली.
*अखंडित पुरवठा: रशिया-युक्रेन युद्ध आणि पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे दर वाढत आहेत. मात्र, केंद्र आणि गोवा सरकारच्या समन्वयामुळे राज्यात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा विनाव्यत्यय सुरू आहे.
काँग्रेसचा दुटप्पीपणा: तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी स्वतः महागाई, बेरोजगारी आणि सोन्याच्या आयातीवरून जनतेला हतबलता दर्शवली होती. मात्र, आज जेव्हा देश प्रगती करत आहे, तेव्हा हेच पक्ष केवळ राजकारण करण्यासाठी टीका करत आहेत.
*अर्थव्यवस्थेची झेप: २०१४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ‘फ्रॅजिल ५’ (नाजूक पाच) मध्ये मोडत होती. मात्र, आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे.
*भांडवली खर्चात मोठी वाढ: २०१४-१५ मध्ये देशाचा भांडवली खर्च (Capital Expenditure) केवळ २ लाख कोटी रुपये होता, जो २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात *१२ लाख कोटी रुपयांवर* पोहोचला आहे. ही आकडेवारीच देशाच्या विकासाची साक्ष देते.
यतीश नाईक पुढे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी दिलेली हाक जनतेने स्वीकारली आहे. विरोधाकांनी राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर राजकारण करणे थांबवावे आणि वस्तुस्थिती समजून घ्यावी.”