गोवा खबर : खारेबांध –नावेली परिसरात अन्न सुरक्षा विभागाने केलेल्या नियमित तपासणीदरम्यान दोन रेस्टॉरंट्स विनावैध FSSAI परवाना सुरू असल्याचे आढळून आले. या ठिकाणी अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत अन्न व्यवसाय सुरू असल्याचेही निदर्शनास आले.
तपासणीवेळी खराब स्वच्छता, अन्न हाताळण्यातील निष्काळजीपणा, कीटकांचा प्रादुर्भाव, कर्मचाऱ्यांकडे हेल्थ कार्ड नसणे तसेच अन्न साठवणुकीच्या अपुऱ्या सुविधा अशा गंभीर त्रुटी आढळल्या. संबंधित ठिकाणांपैकी एका रेस्टॉरंटवर यापूर्वीही दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, नियमांचे पालन न करता व्यवसाय सुरू ठेवण्यात आला होता.
या दोन्ही आस्थापनांना नियमांचे पूर्ण पालन होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून पुनरावृत्ती झाल्यामुळे दंडही आकारण्यात आला आहे.
गोव्यातील नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ अन्न मिळावे यासाठी अशा तपासण्या आणि कडक कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.