गोवा खबर

मांडवीत मेगा कॅसिनोला ‘पणजेकर अगेन्स्ट कॅसिनो’चा विरोध; पर्यावरण आणि संस्कृतीवर परिणाम होण्याची भीती

Published

on

Spread the love

पणजी : मांडवी नदीत प्रस्तावित मेगा कॅसिनो जहाजाला ‘पणजेकर अगेन्स्ट कॅसिनो’ या बॅनरखाली पणजीतील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला असून संबंधित जहाजाला मांडवी नदीत प्रवेश देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी कॅप्टन ऑफ पोर्ट्स कार्यालयाची भेट घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

या वेळी राज्य निमंत्रक वाल्मिकी नायक, सबिना मार्टिन्स तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. संघटनेच्या प्रतिनिधींनी कॅप्टन ऑफ पोर्ट्स अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत मेगा कॅसिनो जहाजामुळे पर्यावरण, नदी वाहतूक, स्थानिक संस्कृती आणि नागरिकांच्या जीवनशैलीवर गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी चिंता व्यक्त केली.

वाल्मिकी नायक यांनी सांगितले की, सरकारने मूळ परवानाधारक जहाजासाठी ज्या अटी आणि क्षमता निश्चित केल्या आहेत, त्याच अटींचे पालन झाले पाहिजे. सध्याच्या नियमांपेक्षा मोठ्या आकाराचे किंवा वेगळ्या क्षमतेचे जहाज मांडवी नदीत आणण्यास परवानगी देणे नियमबाह्य ठरेल, असा दावा त्यांनी केला. सध्याचा परवाना विशिष्ट जहाजासाठी असल्याने त्याऐवजी दुसरे जहाज आणणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संघटनेने मेगा कॅसिनोमुळे मांडवी नदी परिसरातील पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली आहे. नदी वाहतुकीवर ताण वाढण्याबरोबरच ध्वनी आणि प्रदूषणाचे प्रमाण वाढू शकते, असा आरोप करण्यात आला. तसेच गोव्याची स्थानिक संस्कृती आणि पर्यटनाचा पारंपरिक चेहराही बदलण्याची शक्यता असल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, राज्यातील कॅसिनोविरोधी भूमिका अधिक तीव्र करत ‘इनफ इज इनफ’ या संघटनेने दिल्ली रॉयल पीएनजे ९०० कॅसिनो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नव्या कॅसिनो जहाजाला पणजी बंदर परिसरात जलप्रवास करण्यास दिलेल्या अंतरिम स्थगितीनंतर ही महत्त्वाची कायदेशीर पावले उचलण्यात आली आहेत.

आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे कॅसिनो वादाला नवे वळण मिळाले असले तरी संबंधित कंपनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती उठविण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे भविष्यातील कायदेशीर लढाईसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे.

सरकार आणि प्रशासनाने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन मांडवी नदीत नव्या मेगा कॅसिनो जहाजाला प्रवेश देऊ नये, अन्यथा न्यायालयाचे दार ठोठावण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

Trending

Exit mobile version