गोवा खबर : राज्यातील पूरस्थिती नियंत्रण आणि जलव्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तार/मोईरा नदीच्या जलमार्ग सुधारणा प्रकल्पाची पाहणी केली. गिरीम ते राष्ट्रीय महामार्ग पुलापर्यंत सुरू असलेल्या या प्रकल्पस्थळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह सविस्तर आढावा घेतला.
या पाहणीवेळी जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर, आमदार केदार नाईक तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या प्रकल्पामुळे भविष्यात पूरनियंत्रणास मोठी मदत होणार असून, शेतीसाठी सिंचन व्यवस्था मजबूत होईल आणि पाण्याची उपलब्धता वाढणार आहे, असे सांगण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना देत विशेषतः महामार्ग पुल आणि तार पुलाखालील गाळ काढणे (desilting) तसेच अडथळे दूर करण्याचे निर्देश दिले. यामुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत राहून पूरस्थिती टाळता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
तसेच ज्या ठिकाणी कायमस्वरूपी कामे प्रलंबित आहेत, त्या ठिकाणी तात्पुरत्या संरक्षणात्मक उपाययोजना करून नदीकाठ मजबूत करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, परिसरातील जलव्यवस्थापन अधिक प्रभावी होणार आहे.