गोवा खबर : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकतीच दिल्ली भेट घेऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली. या भेटीत आगामी निवडणुकांची तयारी आणि पक्षाच्या संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
कामगार दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “दिल्ली दौऱ्यादरम्यान राष्ट्रीय अध्यक्षांसोबत निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे. तसेच, येणाऱ्या काळात गोव्यात भाजपच्या नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन होणार असून, त्या निमित्ताने पक्षाचे वरिष्ठ नेते गोव्याचा दौरा करणार आहेत.”
या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक देखील उपस्थित होते. या भेटीमुळे आगामी काळात गोव्यातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विविध संघटनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्ष अधिक मजबूत करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.