गोवा खबर

(MPLAD) योजनेतून पिर्णा येथील श्री शांतादुर्गा विद्यालयाला एक ‘बालरथ’ स्कुलबस प्रदान

Published

on

Spread the love


विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या वचनबद्धतेसाठी कटिबद्ध – ऊर्जा राज्य मंत्री श्री नाईक

गोवा खबर:उत्तर गोव्याचे खासदार तसेच केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्री श्रीपाद नाईक यांनी खासदार स्थानिक विकास निधी (MPLAD) योजनेतून पिर्णा-बार्देश येथील श्री शांतादुर्गा विद्यालयाला एक ‘बालरथ’ स्कुलबस  आज प्रदान केली. यावेळी झालेल्या समारंभात राज्यसभेचे खासदार श्री सदानंद शेट तानावडे यांच्यासह उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी श्री अंकित यादव, स्थानिक लोकप्रतिनिधी व विद्यार्थी-विद्यार्थीनी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या आमच्या वचनबद्धतेसाठी आम्ही कटिबद्ध असून एमपीएलएडी योजनेअंतर्गत पिर्णा-बार्देश येथील श्री शांतादुर्गा विद्यालयास एक स्कूल बस सुपूर्द केली असल्याचे मंत्री श्री नाईक यांनी यावेळी बोलताना सांगितले.

उत्तर गोवा लोकसभा मतदार संघातील अनेक गावांमध्ये खासदार स्थानिक विकास निधीतून अनेक अत्यावश्यक लोकोपयोगी सोयी-सुविधा पुरवण्यात येत असल्याचे श्री. नाईक म्हणाले. केवळ लोकसभा मतदार संघातच नव्हे तर गोव्यातल्या गावागावात सर्व सामान्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प अनुदान तत्वावर राबवणार ज्यामुळे जनतेला अधिकच्या वीज बिलातून मुक्ती मिळेल असेही ते म्हणाले. विकसित भारत-2047 साठीच्या स्वप्नपूर्तीसाठी  आजच्या शालेय विद्यार्थ्याना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत तरच सक्षम आणि स्वयंपूर्ण पिढी घडू शकेल. त्यासाठीच आपण आपल्या खासदार विकासनिधीतून शैक्षणिक पायाभूत सुविधा अधिक बळकट करत  असल्याचे श्री. नाईक म्हणाले.

शालेय विद्यार्थ्यांसाठी खासदार विकास निधीतून श्री शांतादुर्गा विद्यालयाला स्कूल बस दिल्याबद्दल राज्यसभेचे खासदार श्री सदानंद शेट तानावडे यांनी यावेळी राज्यमंत्री श्री नाईक यांचे आभार मानले. स्थानिक विकास निधीतून लोकांसाठी उपयुक्त योजना राबवण्यासाठी जिल्हा प्रशासन नेहमीच सकारात्मक भूमिका घेत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. अंकित यादव यांनी सांगितले.

Trending

Exit mobile version