गोवा खबर : गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (GBSHSE) इयत्ता दहावी (SSC) मार्च 2026 परीक्षेच्या निकालाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली असून हा निकाल 26 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल पणजीतील पोर्वोरिम येथील मंडळाच्या “मंथन” कॉन्फरन्स हॉलमध्ये अधिकृतरीत्या घोषित केला जाणार आहे.
मार्च 2026 ची SSC परीक्षा 13 मार्च ते 9 एप्रिल या कालावधीत राज्यभरातील 32 परीक्षा केंद्रांवर पार पडली होती. या परीक्षेसाठी एकूण 20,659 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यामध्ये 10,819 मुलगे आणि 9,840 मुलींचा समावेश आहे. याशिवाय खाजगी उमेदवार, NSQF विषय निवडलेले विद्यार्थी तसेच विशेष गरज असलेले विद्यार्थीही परीक्षेला बसले होते.
निकाल जाहीर झाल्यानंतर तो मंडळाच्या अधिकृत www.gbshse.in तसेच results.gbshsegoa.net या संकेतस्थळांवर उपलब्ध होणार असून विद्यार्थ्यांना DigiLocker अॅपद्वारेही निकाल पाहता येणार आहे. शाळांना एकत्रित गुणपत्रिका 28 एप्रिलपासून डाउनलोड करता येणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, गुणपत्रिकांचे वितरण शाळेमार्फतच करण्यात येणार असून यासंदर्भात पालक किंवा विद्यार्थ्यांनी थेट मंडळाशी संपर्क साधू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही शंका किंवा माहितीसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेशी संपर्क साधावा, असेही मंडळाने नमूद केले आहे.
गेल्या वर्षी मार्च 2025 मध्ये झालेल्या परीक्षेत 95.35 टक्के इतका निकाल लागला होता. यंदाही चांगल्या निकालाची अपेक्षा व्यक्त केली जात असून आता संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांचे लक्ष 26 एप्रिलकडे लागले आहे.