गोवा खबर:सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत, वाळपई, सत्तरी येथे समाजकल्याण संचालनालय, गोवा सरकारतर्फे ‘अटल आसरा योजना’ शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातून “प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचवणे” हा सरकारचा ठाम निर्धार पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
या उपक्रमाबाबत प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री विश्व्जीत राणे यांनी स्पष्टपणे सांगितले की, आता योजनांचा लाभ फक्त कागदपत्रांपुरता मर्यादित राहणार नाही, तर तो थेट प्रत्येक गरजू नागरिकांच्या दारी पोहोचेल. “वाट पाहण्याचा काळ संपला असून, आता सेवा आणि वितरणाचा काळ सुरू झाला आहे,” असा ठाम संदेश त्यांनी दिला.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी सुभाष फळदेसाई यांचे विशेष आभार मानले. समाजातील दुर्बल घटकांपर्यंत योजना प्रभावीपणे पोहोचवण्याचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
आरोग्यमंत्री राणे यांनी पुढे सांगितले की, “अंत्योदय” ही केवळ संकल्पना नसून शासनाची कार्यपद्धती बनली आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा लाभ पोहोचवणे, त्यांना सशक्त करणे आणि त्यांना सन्मानाने जगण्याची संधी देणे, हेच या धोरणाचे मूळ आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली “सेवा, वेग आणि संवेदनशीलता” या तत्त्वांवर आधारित प्रशासनाची नवी ओळख निर्माण झाली आहे. घरकुल सहाय्य, विविध कल्याणकारी योजना, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि सन्मानाने जीवन जगण्याची संधी — या सर्व बाबींच्या माध्यमातून एक सक्षम, स्वयंपूर्ण आणि सशक्त समाज घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
“जो हक्कदार आहे, त्याला अधिकार मिळेल आणि जो वंचित आहे, त्याला सन्मान मिळेल — हाच नव्या भारताचा मार्ग आहे,” असे ठाम मतही त्यांनी व्यक्त केले.
या शिबिरामुळे सत्तरी तालुक्यातील अनेक नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळाला असून, शासन-जनता यांच्यातील दुवा अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून आले आहे.