गोवा खबर

सावधान! वाढत्या उन्हाचा आरोग्याला धोका; आरोग्य खात्याकडून ‘हिट स्ट्रोक’पासून बचावासाठी नियमावली जारी

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यात सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागला असून, उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी आरोग्य सेवा खात्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उष्णतेपासून बचावासाठी काय करावे?

  • पेय पदार्थांचे सेवन: तहान लागलेली नसली तरीही भरपूर पाणी प्यावे. याशिवाय फळांचा रस, ताक, लस्सी किंवा लिंबू सरबत यांसारख्या पातळ पदार्थांचे सेवन वाढवावे.
  • पेहराव: उन्हात बाहेर पडताना हलक्या रंगाचे, सुती आणि सैल कपडे घालावेत.
  • घरातील वातावरण: स्वयंपाकघरात हवा खेळती राहण्यासाठी दारे-खिडक्या उघड्या ठेवाव्यात. दुपारच्या वेळी खिडक्यांना पडदे किंवा बेडशीट लावून सूर्यप्रकाश रोखावा.
  • कामाचे नियोजन: दुपारच्या प्रखर उन्हात कष्टाची कामे करणे टाळावे. पत्र्याच्या घरात राहणाऱ्यांनी उष्णता वाढल्यास थंड ठिकाणी आश्रय घ्यावा.

लहान मुलांची विशेष काळजी घ्या

  • केवळ आईच्या दुधावर असलेल्या बाळांना वारंवार स्तनपान करावे.
  • सहा महिन्यांवरील मुलांना पूरक आहारासोबतच थोड्या प्रमाणात कोमट करून थंड केलेले पाणी पाजत राहावे.
  • मुलांना दुपारच्या वेळी घराबाहेर खेळू देऊ नका आणि त्यांच्या झोपण्यासाठी घरातील थंड जागेची निवड करावी.

ही लक्षणे दिसल्यास व्हा सावध!

उष्णतेमुळे खालील त्रास जाणवू शकतात:

  • डोके दुखणे किंवा चक्कर येणे.
  • प्रखर उष्णता असूनही घाम न येणे आणि त्वचा लाल पडणे.
  • स्नायू कमजोर होणे, क्रॅम्प येणे किंवा उलट्या होणे.
  • छातीत धडधडणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा बेशुद्ध पडणे.

आपत्कालीन स्थितीत काय करावे?

असा त्रास होणाऱ्या व्यक्तीला तातडीने सावलीत किंवा वारा खेळणाऱ्या जागी न्यावे. अंगावरील जास्तीचे कपडे काढून ओल्या कापडाने किंवा बर्फाने शरीर पुसून तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. श्वास घेण्यास त्रास झाल्यास किंवा व्यक्ती बेशुद्ध पडल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात हलवावे.

आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे की, गरमीच्या दिवसांत अल्कोहोलचे सेवन टाळणे आरोग्यासाठी हिताचे आहे.

Trending

Exit mobile version