गोवा खबर : पेडणे मतदारसंघातील भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर आणि माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक युद्धामुळे भाजप पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले आहे की, या दोन्ही नेत्यांना बोलावून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले जाईल.
गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही नेते एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आमदार आर्लेकर यांनी आजगांवकरांवर टीका करताना म्हटले होते की, लोकांनी त्यांना घरी बसवले असून आता त्यांचे वय नातवंडांसोबत खेळण्याचे आहे. याला उत्तर देताना आजगावकर यांनी आर्लेकर यांच्या कार्यकाळात विकास रखडल्याचा आणि बेरोजगारी वाढल्याचा आरोप केला.
मोपा विमानतळावरील टॅक्सी दराचा प्रश्न सोडवण्यात आर्लेकर अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली. या वादावर प्रतिक्रिया देताना दामू नाईक म्हणाले की, “प्रत्येकाने पक्षाची शिस्त पाळायला हवी. पक्षाच्या प्रतिमेला तडा जाईल असे वर्तन खपवून घेतले जाणार नाही.” या दोन्ही नेत्यांना आमनेसामने बसवून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष करणार आहेत.