गोवा खबर : फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणूक रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान न देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत ही भूमिका स्पष्ट केली.
नाईक म्हणाले की, “न्यायालयाने दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे, त्यामुळे त्याविरोधात याचिका दाखल करणे आम्हाला योग्य वाटले नाही.” दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार केतन भाटीकर यांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे, त्यावर काय निकाल येतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दामू नाईक यांनी सांगितले की, जरी फोंड्याला सध्या आमदार नसला तरी भाजपची संघटना तिथे पूर्ण ताकदीने काम करत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्वतः फोंडा मतदारसंघातील विकासकामांकडे लक्ष देत असून नियोजित प्रकल्प थांबणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली. निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी हा निवडणूक आयोगाचा विषय असून सरकारचा संबंध नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.