गोवा खबर : सिंधुदुर्गातील वास्तव्यानंतर ‘ओंकार’ नावाच्या हत्तीने पुन्हा एकदा गोव्याच्या सीमेत प्रवेश केला असून तो रविवारी पहाटे तोरसे परिसरात दिसून आला. यामुळे पेडणे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. भात, मिरची, उडीद आणि भुईमूग यांसारखी पिके सध्या ऐन हंगामात असताना हत्तीच्या वावरामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सीमावादामुळे उपाययोजनेत अडथळे ओंकार हत्ती सध्या गोवा-महाराष्ट्र सीमेवर फिरत असल्याने कारवाईत तांत्रिक अडचणी येत आहेत. गोव्याचे वन अधिकारी त्याला महाराष्ट्राच्या दिशेने हाकलतात, तर महाराष्ट्रातील नागरिक त्याला पुन्हा गोव्याच्या बाजूला पाठवत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या समन्वय अभावाचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसत असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी शेतकरी दयानंद गवंडी आणि केतन सामंत यांनी केली आहे.
आमदार प्रवीण आर्लेकर यांनी नुकतीच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या, मात्र अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. सध्या वन खाते हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून असून वस्तीमध्ये हत्ती शिरू नये यासाठी गस्त वाढवण्यात आली आहे.