गोवा खबर

हणजूण क्लब पार्टीत तरुणाचा मृत्यू; रक्तात आढळले कोकेन आणि एक्स्टसीसह ५ प्रकारचे ड्रग्ज

Published

on

Spread the love

गोवा खबर : हणजूण येथील एका प्रसिद्ध क्लबमध्ये पार्टीसाठी आलेल्या २९ वर्षीय इशान बडगुजर या तरुणाचा मृत्यू अमली पदार्थांच्या विळख्यामुळे झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तांत्रिक तपासणीनंतर इशानच्या रक्तात कोकेन आणि एक्स्टसीसह तब्बल पाच अत्यंत घातक अमली पदार्थांचे अंश सापडल्याने खळबळ उडाली आहे.

तांत्रिक तपासणीतून धक्कादायक वास्तव: सोमवारी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात रेंडॉक्स मशीनद्वारे इशानच्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. या अहवालानुसार, त्याच्या शरीरात एम्फेटामाईन, मेट एम्फेटामाईन, टीएचसी (गांजा), डायजोपीन आणि कोकेन यांसारख्या जीवघेण्या ड्रग्जचे मिश्रण आढळले आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात विविध अमली पदार्थ शरीरात गेल्यामुळे इशानच्या महत्त्वाच्या अवयवांवर प्रचंड ताण आला आणि त्याचा मृत्यू ओढवला.

व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा: यापूर्वीच्या पोस्टमार्टम अहवालात इशानच्या फुफ्फुसात आणि मेंदूला मोठी सूज आल्याचे (इडिमा) नमूद करण्यात आले होते. आता अधिक स्पष्टतेसाठी इशानचा व्हिसेरा रासायनिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आला आहे. या अहवालातून त्याने नेमके किती प्रमाणात ड्रग्ज घेतले होते, हे स्पष्ट होईल. दरम्यान, हणजूण पोलिसांनी आता हे ड्रग्ज त्याला कोणी पुरवले, याचा तपास सुरू केला असून नाईट क्लबमधील अमली पदार्थांच्या उघड विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Trending

Exit mobile version