गोवा खबर :गोव्यातील गृहनिर्माण प्रकल्पांबाबत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, ५० पेक्षा जास्त फ्लॅट्स असलेल्या प्रत्येक नवीन प्रकल्पाला आता स्वतःचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) उभारणे बंधनकारक असणार आहे. नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी काल ही घोषणा केली.
महत्वाचे मुद्दे:
नवा कायदा: राज्य सरकार लवकरच यासंदर्भात नवा कायदा आणणार आहे. यापुढे ५० पेक्षा अधिक सदनिका असलेल्या प्रकल्पांना प्रक्रिया केल्याशिवाय सांडपाणी थेट निसर्गात सोडता येणार नाही.
पाण्याचा पुनर्वापर : प्रक्रिया केलेले पाणी बागकामासाठी किंवा इतर दुय्यम कामांसाठी वापरता येईल.
दाबोळीतील कारवाई : दाबोळी येथे ‘प्रभू बिल्डर्स’च्या प्रकल्पात सांडपाणी थेट सोडले जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यावर कडक भूमिका घेत मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बिल्डरवर न्यायालयात खटला भरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मुंबईच्या धर्तीवर गोव्यातील पर्यावरण रक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.