सरस्वती फाउंडेशन व भाजप युवा मोर्चाच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद
गोवा खबर:रक्तदान हे अत्यंत महत्त्वाचे दान असून, त्यातून अनेकांना जीवनदान मिळते. त्यामुळे आवश्यकतेच्या वेळी युवकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे, असे आवाहन मांद्रेचे माजी आमदार तथा बालभवन चेअरमन दयानंद सोपटे यांनी केले.
मांद्रे जिल्हा पंचायत सभागृहात सरस्वती फाउंडेशन व मांद्रे भाजप मंडळ युवा मोर्चातर्फे आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सोपटे म्हणाले की, परमेश्वराने दिलेले हे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी
प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते आणि या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो. युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून असे उपक्रम राबवले जात असून, त्यातून अनेकांचे प्राण वाचले आहेत.
उद्घाटन सत्राला पार्सेचे माजी सरपंच अजय कळगुटकर, भाजपचे आशिष शेटगावकर, साईनंद सोपटे, साईदीप सोपटे, दाजी आजगावकर, मनोज जोशी, परेश सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी आशिष शेटगावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
माजी आमदार सोपटे म्हणाले, रक्तदान हे केवळ समाजसेवेचे कार्य नसून ते दात्याच्या आरोग्यासाठीही लाभदायक आहे. एका रक्तदानामुळे एखाद्या गरजू रुग्णाला जीवनदान मिळू शकते, त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे, असे सोपटे यांनी सांगितले.
या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले. रक्तदान केलेल्यांचे सरस्वती फाउंडेशन व मांद्रे भाजप मंडळ युवा मोर्चातर्फे अभिनंदन केले.