रवींद्र भवन, साखळी येथे ३ एप्रिलला मुख्यमंत्र्याच्या हस्ते बक्षिस वितरण
गोवा खबर : अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटना आणि गोवा सरकारचे पुराभिलेक अन् पुरातत्त्व संचानलाय यांच्या संयुक्त विद्यमाने गतवर्षी दिपावलीच्या निमित्ताने युवकांमध्ये शौर्यजागृती करण्यासाठी राज्यस्तरीय ‘किल्ले बनवा स्पर्धे’चे आयोजन केले होते. या अंतर्गत राज्यभरातून १५२ किल्ले साकारण्यात आले होते आणि स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. स्पर्धेचा निकालही घोषित झालेला आहे. या स्पर्धेचे बक्षिण वितरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुक्रवार, ३ एप्रिल या दिवशी सायंकाळी ४ वाजता रवींद्र भवन, साखळी येथे होणार आहे.
कार्यक्रमाचे वैशिष्ट म्हणजे फोंडा येथील ‘मर्दनगडा’चे संवर्धन व्हावे यासाठी गोवा विधानसभेत मागणी करणारे वास्को मतदारसंघाचे भाजपचे आमदार दाजी (कृष्णा) साळकर आणि ‘मर्दनगडा’चे संवर्धनासाठी सर्वतोपरी सहकार्य करणारे गोवा सरकारमधील तत्कालीन पुराभिलेक अन् पुरातत्त्व मंत्री आणि विद्यमान समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचा ‘मर्दनगड संवर्धन समिती’ आणि अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटना’ यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमाला ‘अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटने’चे अध्यक्ष संकेत आर्सेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांचीही उपस्थित असणार आहे, अशी माहिती अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटनेचे सचिव सत्यविजय नाईक यांनी दिली आहे.
अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटनेने ‘किल्ले बनवा स्पर्धा’ ही समुदाय स्तरावरील स्पर्धा जिल्हास्तरावर (उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा), तर वैयक्तिक घरगुती स्तरावरील स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित केली होती. स्पर्धेत समुदाय स्तरावर ५८, तर वैयक्तिक घरगुती स्तरावर ९४ स्पर्धक सहभागी झाले होते. या बक्षिस वितरण सोहळ्याला सर्व स्पर्धक आणि शिवप्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी, असे आवाहन अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटननेने केले आहे.
‘मर्दनगड संवर्धन समिती’ने मानले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार
गोवा प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा, १९७८’ अंतर्गत फोंडा येथील ‘मर्दनगड’ आणि जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ या ऐतिहासिक वास्तू संरक्षित स्मारके म्हणून घोषित करून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा स्तुत्य निर्णय गोवा सरकारने नुकताच घेतला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी बांधलेल्या गोव्यातील या एकमेव किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने दाखवलेल्या कटिबद्धतेबद्दल ‘मर्दनगड संवर्धन समिती’ने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार मानले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ,‘गोव्याचा वारसा जतन करण्ो आणि ‘हिंदवी स्वराज्या’चा इतिहास युवा पिढीपर्यंत पोहोचवणे यांसाठी सरकार पूर्ण सहकार्य करणार’, असे आश्वासन ‘मर्दनगड संवर्धन समिती’ला दिले.