गोवा खबर : आकाशवाणीचे माजी वृत्त संपादक आणि गोवा ज्येष्ठ पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सतीश नाईक (७७) यांच्या निधनाबद्दल गोवा श्रमिक पत्रकार संघटनेला (गुज) अतीव दुःख होत आहे. त्यांच्या निधनाने गोव्याच्या पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. प्रदीर्घ आजाराशी झुंज देणाऱ्या नाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला.
सतीश नाईक यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात ‘दैनिक नवप्रभा’ मधून केली होती. त्यानंतर त्यांनी माहिती खात्यात माहिती अधिकारी म्हणून काम पाहिले. पुढे आकाशवाणीच्या पणजी केंद्रात वृत्त संपादक म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ सेवा बजावली. तसेच त्यांनी दूरदर्शनसाठीही योगदान दिले होते. पत्र सूचना कार्यालयात (पीआयबी) उपसंचालक म्हणून काम केल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले.
निवृत्तीनंतरही ते पत्रकारितेच्या कार्यात सदैव सक्रिय राहिले. पत्रकारिता क्षेत्र आणि पत्रकार या दोघांसाठीही त्यांचे योगदान मोलाचे आहे. विशेषतः संघटनेच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सतीश नाईक हे केवळ एक पत्रकार नसून नव्या पिढीसाठी मार्गदर्शक होते. त्यांच्या निधनाने एका अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्वाचा अस्त झाला आहे. त्यांचे कार्य आणि पत्रकारितेतील निष्ठा सदैव स्मरणात राहील. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे.
दिवंगत नाईक यांच्या पार्थिवावर आज दुपारी १ वाजता म्हापसा येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ‘गुज’ त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून, त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.