गोवा खबर : फोंडा मतदारसंघातील आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही काँगेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडीचा भाग म्हणून गोवा फॉरवर्ड स्वतःचा उमेदवार उभा करणार नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते, दुर्गादास कामत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रशांत नाईक, मोहनदास लोलयेकर आदी उपस्थित होते.
दुर्गादास कामत म्हणाले, ‘ही निवडणूक राज्याची राजकीय दिशा ठरवणारी आहे, त्यामुळे सर्व विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. भाजपला पराभूत करणे हाच आमचा उद्देश आहे. याअनुषंगाने आम्ही पोटनिवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देत आहोत.
प्रशांत नाईक म्हणाले, ‘पक्ष राज्यभर संघटन मजबुतीवर भर देत आहे. अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला व्यापक जनसमर्थन मिळत असून भविष्यात अधिक बळकट राजकीय पर्याय म्हणून उदयास येण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
मोहनदास लोलयेकर म्हणाले, ‘आम्ही काँग्रेसला या निवडणुकीत पाठिंबा देत असलो तरी राज्यातील खरा विरोधी पक्ष गोवा फॉरवर्ड पक्षच आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात विजय सरदेसाई यांनी विविध लोकहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडले.जनतेमध्ये त्यांना विरोधी पक्षनेत्यासारखी मान्यता मिळत आहे. यंदा पक्षाच्या स्थापनेच्या १० वर्षपूर्तीनिमित्त ३० मे रोजी लोहिया मैदान येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यभर २५ मतदारसंघात समित्या सक्रिय आणि भक्कम करण्याचा निर्णय आम्हीं घेतला आहे. पुढील काळात त्याची तयारी केली जाईल.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी काही महिन्यांत राज्यातील २५ ते ३० मतदारसंघात गोवा फॉरवर्डची कार्यकारिणी समिती भक्कम केली जाणार आहे. त्यामुळे शक्य असल्यास २५ मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे करू शकतो. आम्ही राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच घेतली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पक्ष बळकटीच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला. आगामी पालिका निवडणुकीसाठीदेखील आम्ही तयारीला लागलो आहोत, अशी माहिती मोहनदास लोलयेकर यांनी दिली.