गोवा खबर:धनश्री जाधव हिच्या कवितेतील शब्दांची मांडणी अतिशय सुंदर आणि भावपूर्ण आहे. कवितासंग्रहातील अनेक कविता मनाला स्पर्श करणाऱ्या आहेत, आपली कविता प्रगल्भ व्हावी यासाठी सातत्याने लेखन करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी केले. कु. धनश्री विजय जाधव हिच्या ’स्वप्नांची पायरी’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कवितांमध्ये जीवनाचे खरे प्रतिबिंब दिसते. प्रत्येक कविता वाचताना वेगळाच अनुभव येतो. आपल्या आईवरील कविता मनात खोलवर विचार करायला लावणाऱ्या आहेत, असे मत परेश हनुमंत नाईक यांनी प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना व्यक्त केले.
साध्या शब्दांत मोठा अर्थ सांगणाऱ्या या कविता असून कवीची शैलीही प्रभावी आहे. त्यामुळे धनश्री जाधव हिच्या निमित्ताने मराठी साहित्यात एक नवे आशास्थान निर्माण झाले आहे, असे मत प्रा. अशोक रघुनाथ आलगोंडी यांनी व्यक्त केले
या काव्यसंग्रहातील कवितांचा अर्थ खूप खोल आणि विचारपूर्ण आहे. कवयित्रीची कल्पनाशक्ती अप्रतिम आहे. यातील बऱ्याच कविता जीवनाचा एक संदेश देणाऱ्या आहेत, असे मत प्रा. प्रेमानंद म. नाईक या यावेळी व्यक्त केले.
शालेय जीवनापासून मी धनश्रीचा साहित्य प्रवास पाहात आले आहे, वाचकांच्या मनात ठसा उमटवणारे लेखन ती करत आहे असा मला सार्थ अभिमान आहे, असे मत सौ. प्रज्ञा पाध्ये टेंग्से यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी संपन्न झालेल्या कविसंमेलनात या कविसंमेलनात सिया गावडे, धनश्री जाधव, स्वराली प्रमोद टेंग्से, यतिन फाटक, प्राची जयवंत नाईक, सौ. उषा तुषार नाईक, अतुल जोशी, किर्ती गावडे, अंकिता देऊलकर, सुविधा राहुल ढोरे व यशवंत दिलीप भट यांनी कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विजयसिंह आजगांवकर यांनी केले.