गोवा खबर

गोव्यातील उद्योग-शैक्षणिक संस्था सहकार्य यावर “कॅम्पस टू करिअर”द्वारे प्रकाश

Published

on

Spread the love


गोवा खबर : उच्च शिक्षण संचालनालय (DHE) आणि गोवा राज्य उच्च शिक्षण परिषद (GSHEC) यांनी गोवा औद्योगिक विकास महामंडळ (GIDC) आणि उद्योग व वाणिज्य विभाग (DITC) यांच्या सहकार्याने “कॅम्पस टू करिअर” या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांमध्ये अर्थपूर्ण सहभाग वाढवून, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील दरी कमी करणे, तसेच गोव्यातील तरुणांची रोजगारक्षमता वाढवणे, हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट होते. रोजगार निर्मिती क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठीच्या सहयोगी दृष्टिकोनाचा अवलंब करत या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी एकत्र आले होते.

याप्रसंगी बोलताना, गोवा आयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रविमल अभिषेक, IAS यांनी गोवा-आयडीसीकडे ३००हून अधिक उद्योगसंस्था नोंदणीकृत असल्याचे अधोरेखित करत राज्यामध्ये रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध असल्याचे सांगितले.

अनुत्तीर्ण किंवा सर्व विषय न सुटलेल्या विद्यार्थ्यांसह सर्वच विद्यार्थ्यांना रोजगारसंधी उपलब्ध करण्याबाबतच्या या उपक्रमाचे उद्दिष्टावर त्यांनी भर दिला आणि स्थानिक प्रतिभेला उद्योगाच्या गरजांशी जोडण्यासाठी एका डिजिटल प्लॅटफॉर्मच्या प्रस्तावित विकासाची माहिती दिली.

शिक्षण सचिव प्रसाद लोलायेंकर, आयएएस, यांनी नमूद केले की, या उपक्रमाने शिक्षण आणि उद्योग विभागांना प्रथमच एका संरचित पद्धतीने एकत्र आणले आहे. त्यामुळे हा उपक्रमाचे महत्त्व वेगळे ठरते. त्यांनी प्राध्यापकांच्या सातत्यपूर्ण श्रेणीसुधारणेच्या महत्त्वावर जोर दिला आणि शिक्षण व उद्योग यांच्यातील दरी कमी करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

जीएसआयएचे अध्यक्ष प्रदीप डा कोस्टा आणि जीसीसीआयचे उपाध्यक्ष यतीन काकोडकर यांच्यासह उद्योग प्रतिनिधींनी उद्योग-व्यवसाय संस्थांपुढे उद्योग-कुशल प्रतिभेची मर्यादित उपलब्धता, प्रत्यक्ष अनुभवाची गरज आणि रोजगारक्षमतेशी संबंधित आव्हाने यांसारख्या प्रमुख आव्हानांवर प्रकाश टाकला. अशा उपक्रमांमुळे उद्योग व शिक्षण संस्थांमधील संबंध अधिक दृढ होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

उच्च शिक्षण संचालनालयाचे कार्यक्रम संचालक डॉ. नियान मार्चोन यांनी गोव्यातील उच्च शिक्षण क्षेत्राचा आढावा सादर केला. उच्च शिक्षण संचालनालयाने हाती घेतलेल्या इंटर्नशिप, इन्क्युबेशन सेंटर, उद्योग सहकार्य आणि कौशल्य विकास कार्यक्रमांसारख्या विविध उपक्रमांची रूपरेषा त्यांनी मांडली. विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकताना संचालनालयाने राबविलेल्या विविध उपक्रमांचे विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटमध्ये वाढ, उद्योग क्षेत्रातील वाढीव अनुभव आणि सुधारित रोजगारक्षमता या संदर्भातील सकारात्मक परिणाम सादर केले. याव्यतिरिक्त, त्यांनी उद्योगांच्या गरजांशी निगडित अभ्यासक्रमातील उणिवा, मर्यादित अनुभव आणि उद्योग क्षेत्राच्या विकासाच्या तुलनेत शैक्षणिक प्रणालीची तुलनेने मंद गती यांसारख्या मर्यादांवर प्रकाश टाकला.

रॅम्प (RAMP) लाभार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यानंतर सरकार, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील प्रमुख हितधारकांचा समावेश असलेली एक पॅनल चर्चा झाली. या चर्चेत उद्योगाच्या गरजा, आवश्यक कौशल्ये आणि सध्याची तफावत भरून काढण्यासाठी सहयोगी प्रयत्नांच्या गरजेवर लक्ष केंद्रित करण्यात आले. सहभागींच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एक संवादात्मक सत्रही आयोजित करण्यात आले होते.
या कार्यशाळेत गोव्यातील उद्योग प्रतिनिधी, उद्योजक आणि शैक्षणिक क्षेत्रातील शीर्षस्थ प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घेतला. गोव्यातील तरुणांसाठी रोजगारक्षमता आणि करिअरच्या संधी वाढवण्यासाठी शिक्षण आणि उद्योग यांच्यात निरंतर सहकार्याचा भक्कम पाया घालण्याचा विश्वास व्यक्त करत या कार्यशाळेचा सकारात्मक समारोप झाला.

Trending

Exit mobile version