गोवा खबर

दोना-पावला इथे आयोजित गांधी शिल्प बाजारमध्ये भारताच्या समृद्ध आदिवासी हस्तकलेचे प्रदर्शन

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यात दोना-पावला इथल्या आंतरराष्ट्रीय केंद्रात आज आयोजित गांधी शिल्प बाजारात, भारताच्या आदिवासी हस्तकला व कौशल्याचे चैतन्यमय, विविधरंगी प्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. भारताच्या समृद्ध कला परंपरांचा उत्सव साजरा करण्याच्या हेतूने आयोजित या प्रदर्शनामुळे, देशभरातील कुशल कारागिरांना त्यांच्या पारंपरिक कला कौशल्य सादर करण्याचे एक प्रभावी व्यासपीठ मिळाले आहे.

आसाम लघु उद्योग विकास महामंडळाने हे प्रदर्शन आयोजित केले होते, तर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील विकास आयुक्तालय (हस्तकौशल्ये) यांनी राष्ट्रीय हस्तकला विकास अभियानाअंतर्गत ते पुरस्कृत केले होते. या कला बाजारात, देशभरातून, विशेषतः ईशान्य प्रदेशातल्या राज्यांतून आलेल्या विशेष आदिवासी कला कौशल्याच्या वस्तू मांडण्यात आल्या होत्या.

प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे, गोवा सरकारच्या , हस्तकला, वस्त्रोद्योग आणि कोयर विभागाचे संचालक, सगुण वेलिप यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला प्रादेशिक संचालक (पश्चिम विभाग), दीप्तांशू हलदर, विकास आयुक्त (हस्तकला); , पणजीच्या हस्तकला सेवा केंद्राचे सहाय्यक संचालक  साजी प्रभाकरन, तसेच ASIDC, गुवाहाटीचे कार्यक्रम समन्वयक देबाशीष दास, आदि उपस्थित होते.

यावेळी, सगुण वेलिप यांनी आपल्या भाषणात, देशाच्या विविध भागातून, मोठा प्रवास करून आलेल्या आदिवासी कलाकारांच्या कलेविषयीची निष्ठा आणि समर्पणाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे पारंपरिक हस्तकलेचे जतन करण्यास मोठी मदत होते. तसेच,  गोव्याच्या नागरिकांना अस्सल आदिवासी कलाकृतींचा अनुभव घेण्याची एक अभिनव संधी मिळाली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

हा कार्यक्रम गोव्यात आयोजित करण्यासाठी आयोजकांनी केलेल्या व्यापक प्रयत्नांबद्दल दीप्तांशू हलदर यांनी यावेळी माहिती दिली. त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत, हस्तकला क्षेत्रातील शासकीय उपक्रमांबाबत विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही दिली. सध्या सुरू असलेल्या योजना भविष्यात अधिक बळकट केल्या जातील आणि कारागिरांना अधिक पाठबळ देण्यासाठी तसेच पारंपरिक हस्तकलेचा प्रसार करण्यासाठी येत्या आर्थिक वर्षात नवीन उपक्रम सुचवले जातील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

या बाजारात भारतभरातील प्रसिद्ध हस्तकलेच्या निवडक वस्तूंचा संग्रह प्रदर्शित करण्यात आला आहे. यात आसामची मेखला चादर, महाराष्ट्रातील बंजारा भरतकाम कला, मध्य प्रदेशातील गोंड चित्रकला, उत्तराखंडची मुंज हस्तकला, तसेच बस्तरची डोकरा धातुशिल्पकला यांचा समावेश असून, देशातील समृद्ध सांस्कृतिक विविधता आणि कारागिरीचे दर्शन या बाजारात घडते.

गांधी शिल्प बाजार 24 मार्च 2026 पर्यंत दररोज दुपारी दोन ते रात्री 10 या वेळेत सर्वसामान्यांसाठी खुला राहणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन कारागिरांशी संवाद साधावा आणि भारताच्या पारंपरिक हस्तकलेच्या जतन-संवर्धनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले.

Trending

Exit mobile version