गोवा खबर : पश्चिम आशियामध्ये उद्भवणाऱ्या परिस्थितीमुळे भारत आणि पश्चिम आशिया क्षेत्रातील हवाई वाहतुक प्रभावित होत असल्याने या परिस्थितीवर हवाई वाहतूक मंत्रालय बारकाईने लक्ष ठेवून आहे. सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य तसेच विमान उड्डाणांचे संचालन सुव्यवस्थितपणे करण्याच्या उद्देशाने विमानकंपन्या सर्व आवश्यक कार्यात्मक बदल करत आहेत.
7 मार्च 2026 च्या प्रवाशांच्या वाहतुकीच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की त्या प्रदेशातून भारतीय विमान कंपन्यांच्या एकूण 51 इनबाउंड उड्डाणांनी भारतात आगमन केले, ज्यामध्ये 8,175 प्रवासी होते.
8 मार्च 2026 पासून एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस, इंडिगो, स्पाईसजेट आणि अकासा या भारतीय विमान कंपन्यांनी दुबई, अबूधाबी, रास अल खैमाह, फुजैराह, मस्कत आणि जेद्दाह येथील विमानतळांवरून कार्यान्वयन व्यवहार्यता आणि तेथील परिस्थितीनुसार 49 इनबाउंड विमान उड्डाणांचे नियोजन केले आहे.
सध्याच्या स्थितीनुसार भारतीय विमानकंपन्यांनी 9 मार्च 2026 रोजी 50 विमान उड्डाणांचे नियोजन केले आहे.
याशिवाय त्या ठिकाणाहून अधिक विमानांचे नियोजन करता येईल का याचा अंदाज घेण्यासाठी भारतीय विमान कंपन्या त्या प्रदेशातील इतर विमानतळांवरील प्रत्यक्ष परिस्थितीचे आकलन करत आहेत.
मंत्रालय विमानकंपन्या आणि भागधारकांशी सातत्याने संपर्कात आहेत. या शिवाय याकाळात विमान तिकिटांचे दर वाजवी राहतील आणि त्यात अनावश्यक वाढ होणार नाही यासाठी विमानांच्या तिकिटांच्या दरांवर देखील सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
प्रवाशांनी विमानांच्या वेळापत्रकाविषयी ताजी माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित विमानकंपनीच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला जात आहे. मंत्रालय या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवेल आणि आवश्यकतेनुसार पुढील माहिती देईल.