गोवा खबर

टपाल विभाग 15 मार्च रोजी गोव्यातील 4 केंद्रांवर घेणार आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा

Published

on

Spread the love
  • ‘डिजिटल विश्वात मानवी संवादाचे महत्त्व याविषयी मित्राला पत्र’ ही पत्रलेखनाची संकल्पना

 

गोवा खबर : केंद्र सरकारचा टपाल विभाग गोव्यातील चार केंद्रांवर 15 मार्च 2026 रोजी युवा पिढीसाठी युपीयु 2026 आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा आयोजित करणार आहे. जागतिक टपाल संघटनेच्या वार्षिक उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये सर्जकता, विश्लेषक विचार आणि पत्रलेखन कला या गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा घेतली जात आहे.

गोवा विद्यापीठ, सारस्वत विद्यालय हायस्कूल म्हापसा, ए जे. डी अल्मेडा हायस्कूल फोंडा आणि रोझरी हायर कंडरी स्कूल नवेलिम याठिकाणी गोव्याच्या टपाल विभागाने ही स्पर्धा आयोजित केली आहे.

9 ते 15 वर्ष वयोगटातील विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले नांव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, शाळेचे नांव आणि प्राधान्य केंद्र या तपशीलांसह 3 मार्च 2026 पर्यंत dogoa.mh[at]gmail[dot]com या इमेल आयडीवर नांवनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी प्रियांका कैंसुनकर यांच्याशी 8208263377 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

स्पर्धकांनी ‘डिजिटल विश्वात मानवी संवाद का महत्त्वाचा आहे’ याविषयी मित्राला पत्र लिहायचे आहे. हे पत्र स्वतःच्या हस्ताक्षरात लिहायचे असून त्यासाठी 800 शब्दांची शब्दमर्यादा आहे. पत्र इंग्रजीमध्ये किंवा भारतीय घटनेच्या आठव्या परिशिष्टात नोंद असलेल्या कोणत्याही भाषेत लिहीता येईल. अधिक तपशील भारतीय टपाल विभागाच्या http://www.indiapost.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

क्षेत्रिय विभागात पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी अनुक्रमे 25000, 10000 आणि 5000 रुपयांचे तर राष्ट्रीय स्तरावर अनुक्रमे 50000, 25000 आणि 10000 रुपयांचे बक्षीस आहे . राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम ठरलेले पत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करेल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांना पदके, प्रमाणपत्रे आणि अन्य पारितोषिके दिली जातील. सुवर्णपदक विजेत्या स्पर्धकाला स्वित्झर्लंडमधील बर्न येथील युपीयु  मुख्यालयाला भेट देण्याची संधी मिळू शकेल किंवा अन्य पारितोषिक दिले जाईल.

Trending

Exit mobile version