गोवा खबर

नाईट क्लब्समधील ‘होळी पार्ट्या’ थांबवा : हिंदू जनजागृती समितीची मागणी

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यातील अनेक नाईट क्लब्स, ‘रिव्हर क्रूझ’ आदी ठिकाणी होळीच्या पार्श्वभूमीवर ‘होळी पार्ट्यां’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ‘रेन डान्स’, ‘पूल पार्टी मॅडनेस’, ‘बॉलीवूड डिजे’, ‘इंडियन ढोल डान्स’ आदींचा समावेश करण्यात आला आहे. ‘हयात सेंट्रीक होळी बॅश’ या पार्टीमध्ये बिअरचा अमर्यादित पुरवठा केला जाणार आहे, तसेच निरनिराळे मद्यही पुरवले जाणार आहे. या ठिकाणी ८ वर्षांवरील मुलांना सहभागी होता येणार आहे. यामुळे हिंदूंच्या पवित्र होळी सणाची चुकीची ओळख निर्माण होणार आहे. या पार्ट्या त्वरित थांबवण्याची मागणी उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रशांत परब यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

या वेळी समितीच्या शिष्टमंडळामध्ये गोवा राज्य संघटक सत्यविजय नाईक, ‘रणरागिणी’च्या राजश्री गडेकर, शुभा सावंत, हेमश्री गडेकर व दिलीप शेट्ये यांची उपस्थिती होती.

अल्पवयीनांना सहभागी होण्यास परवानगी देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

अमर्याद बिअर पुरवली जाणाऱ्या ‘हयात सेंट्रीक होळी बॅश’मध्ये अल्पवयीनांना सहभागी होण्यास परवानगी दिल्याबद्दल आयोजकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक हरीश मडकईकर यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची प्रत महिला आणि बालकल्याण संचालिका ज्योती देसाई यांनाही देण्यात आली आहे.

Trending

Exit mobile version