गोवा खबर

अभाविप गोव्यातर्फे विविध भागांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

Published

on

Spread the love

गोवा खबर : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) म्हापसा शहर शाखेच्या वतीने भव्य व उत्साहपूर्ण मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य उत्साह आणि शिवरायांप्रती अखंड श्रद्धा यांचे दर्शन घडवणारी ही मिरवणूक म्हापसा शहरात विशेष आकर्षण ठरली.

म्हापसा शहरातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी व अभाविप कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या ध्वजांच्या दिमाखात आणि जोशपूर्ण शिवघोषणांनी संपूर्ण परिसर शिवमय व राष्ट्रभक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेला.

मिरवणुकीचा प्रारंभ राष्ट्रोळी मंदिर, खोर्ली येथून करण्यात येऊन ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत (म्हापसा) शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. युवकांच्या संघटित व अनुशासित सहभागातून एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि शिवरायांच्या विचारांची प्रेरणा अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून अभाविपचे पूर्व कार्यकर्ता विठ्ठल नाईक उपस्थित होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय नेतृत्वगुणांवर प्रकाश टाकत युवकांनी राष्ट्रनिर्मितीत सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास कोंकण प्रांत सहमंत्री यश कंटक तसेच म्हापसा शहर मंत्री कल्पेश वाळके यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अभाविप कार्यकर्ता अमोघ लोटलीकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सामूहिक शिवगर्जना आणि संपूर्ण “वंदे मातरम” गायनाने राष्ट्रभक्तीच्या वातावरणात करण्यात आली.

याचबरोबर, गोवाभर अभाविपच्या विविध शहर शाखांनी युवकांना सोबत घेऊन शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. पेडणे शहर शाखेद्वारे कोरगाव येथे, साखळी शाखेतर्फे साखळी येथे, डिचोली शाखेतर्फे डिचोली येथील मूर्तीला पुष्पहार अर्पण करून शिववंदना करण्यात आली. तसेच फोंडा शाखेतील कार्यकर्त्यांनी फार्मागुडी येथील किल्ल्यावर जाऊन तर धारबांदोडा येथील कार्यकर्त्यांनी उसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन केले.

या सर्व उपक्रमांतून गोव्यातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करत, आजच्या स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी सजग व कर्तव्यदक्ष नागरिक बनण्याचा संकल्प व्यक्त केला.

Trending

Exit mobile version