गोवा खबर : गोव्याची पारंपरिक लोककला आणि संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या मडगाव कार्निव्हल महोत्सवाला पर्यटकांनी आणि स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली. पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते या दिमाखदार चित्ररथ मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्निव्हलच्या माध्यमातून गोव्याची संस्कृती सातासमुद्रापार पोहोचत असल्याचे नमूद करत रोहन खंवटे म्हणाले की, “गेल्या तीन दिवसांपासून पणजी आणि फोंड्यानंतर आता मडगावमध्येही लोक मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. देश-विदेशातील पर्यटकांना गोव्याची अस्सल ओळख करून देण्याचे काम या महोत्सवातून होत आहे.”
या मिरवणुकीत सुमारे ७४ चित्ररथांचा सहभाग होता, ज्यामध्ये गोव्यातील पारंपरिक सण, निसर्ग आणि सामाजिक विषयांवर आधारित देखावे सादर करण्यात आले. ‘होली स्पिरीट’ चर्चपासून सुरू झालेली ही मिरवणूक मडगाव पालिकेपर्यंत आली, जिथे हजारो लोकांनी या सोहळ्याचा आनंद लुटला.