गोवा खबर

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने गोव्यातील विद्यार्थ्यांमध्ये केवायसी प्रक्रियेविषयी प्रश्नमंजुषेचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर : देशभरात 9 ते 13 फेब्रुवारी 2026 या कालावधीत वित्तीय साक्षरता सप्ताह 2026 पाळला जात आहे. आपल्या ग्राहकाविषयी जाणून घ्या (केवायसी) – सुरक्षित बँकिंगसाठी तुमचे पहिले पाऊल ही यंदाच्या या सप्ताहाची संकल्पना आहे. या सप्ताहाचा एक भाग म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पणजी इथल्या क्षेत्रीय कार्यालयाने दि. 10 फेब्रुवारी 2026 रोजी गोवा बिझनेस स्कूल इथे आर यू अकाउंट एबल…? (Are You Account Able…?) या संकल्पनेवरील एका प्रश्नमंजुषेचे आयोजन केले होते. पदवीपूर्व शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्या ग्राहकाविषयी जाणून घेण्याच्या प्रक्रियेतील मानकांबाबतची जागरूकता वाढवणे हा या प्रश्नमंजुषेचा उद्देश होता.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पणजी इथल्या क्षेत्रीय कार्यालयातील वित्तीय समावेश आणि विकास विभागाच्या उपमहाव्यवस्थापक सँड्रा रॉड्रिग्स यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सुरक्षित बँकिंग सुनिश्चित करण्यासाठी तसेच वित्तीय परिसंस्थेअंतर्गत युवा वर्गाचे  सक्षमीकरण करण्यासाठी वित्तीय साक्षरता तसेच आपल्या ग्राहकाविषयी जाणून घ्या या प्रक्रियेचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

गोव्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित असलेल्या विविध बिगर -तांत्रिक महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी या प्रश्नमंजुषेत भाग घेतला. प्राथमिक पात्रता फेरीनंतर, अव्वल सहा संघांनी अंतिम फेरीत स्पर्धा केली. या प्रश्नमंजुषेनिमीत्त ग्राहकांची पडताळणी, फसवणुकीला प्रतिबंध, नियामक पालन आणि आपल्या ग्राहकाविषयी जाणून घ्या या प्रक्रियेशी संबंधित व्यावहारिक ज्ञानाची चाचणी घेतली गेली.

मडगाव मधील विद्या विकास मंडळाच्या दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स या महाविद्यालयाने या प्रश्नमंजुषेत प्रथम क्रमांक पटकावला, त्यानंतर कुंकळ्ळी एज्युकेशन सोसायटीच्या पार्वतीबाई चौगुले कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स या महाविद्यालयाने दुसरे स्थान, तर गोवा मल्टी फॅकल्टी कॉलेजने तिसरे स्थान मिळवले.

या उपक्रमामुळे युवा वर्गात वित्तीय साक्षरता आणि सुरक्षित बँकिंग पद्धतींविषयी जाणीव निर्माण करण्याप्रति भारतीय रिझर्व्ह बँकेची वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

Trending

Exit mobile version