गोवा खबर

पोटनिवडणुकीत विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे : युरी आलेमाव

Published

on

Spread the love

गोवा खबर : फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे राजकारण चांगलेच तापू लागले आहे. या निवडणुकीत काँग्रेसचाच उमेदवार असेल, असे स्पष्ट करताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे काळाची गरज असल्याचे म्हटले आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना युरी आलेमाव म्हणाले की, “जर भाजपला सत्तेवरून खाली खेचायचे असेल, तर विरोधकांमध्ये एकजुट हाच एकमेव मार्ग आहे. विरोधकांच्या वतीने केवळ एकच सक्षम उमेदवार उभा राहिला, तर आमचा विजय सोपा होईल.”

त्यांनी पुढे नमूद केले की, ही पोटनिवडणूक केवळ एका मतदारसंघापुरती मर्यादित नसून राज्यासाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केला नसला तरी त्यांची तयारी सुरू आहे, त्यामुळे विरोधकांनी वेळ न दवडता एकत्र येऊन निर्णय घ्यायला हवा.

दुसरीकडे, रिव्होल्युशनरी गोअन्स (आरजी) पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनीही युतीसाठी आपले दरवाजे खुले असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा नेत्याने आपल्याशी अधिकृतपणे संपर्क साधलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. परब यांनी फेसबुक पोस्टद्वारे काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका करताना म्हटले की, “गोव्यात पुन्हा एकदा भाजप काँग्रेसच्या नेतृत्वामार्फत आपली खेळी खेळत आहे. जर काँग्रेसला ‘आरजी’ची गरज नसेल, तर त्यांनी आपली भूमिका जाहीरपणे स्पष्ट करावी.”

Trending

Exit mobile version