गोवा खबर

गोव्यात २०२७ साठी भाजप-मगो युतीवर शिक्कामोर्तब; राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या उपस्थितीत निवडणुकीची रणनीती निश्चित

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि महाराष्ट्र गोमंतक पक्ष (मगोप) यांची युती कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन सध्या गोवा दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

युती कायम, विकासाचा अजेंडा पुढे नेणार : सुदिन ढवळीकर

वीजमंत्री आणि मगोपचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांनी आमदार जीत आरोलकर यांच्यासह नितीन नबीन यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ढवळीकर यांनी जाहीर केले की, आगामी विधानसभा निवडणुकीत मगोप आणि भाजप एकत्रच लढतील.

भाजप-मगो युतीमुळे गोव्यात स्थिर सरकार लाभले आहे. राज्याच्या हितासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी ही युती २०२७ मध्येही कायम राहील. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांमुळे जनतेचे प्रश्न सुटत असून लोकांचा विश्वास वाढला आहे, असे ढवळीकर यांनी यावेळी नमूद केले.

या बैठकीत केवळ युतीवरच नाही, तर सध्याची राजकीय परिस्थिती आणि समन्वयावरही सविस्तर चर्चा झाली. यावेळी अपक्ष आमदार चंद्रकांत शेट्ये, अंतोन वाझ आणि आलेक्स रेडिनाल्ड यांची उपस्थितीही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

आमदारांना ‘विजय मंत्र’; जनसंपर्क वाढवण्याच्या सूचना

राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी भाजप आमदारांशी संवाद साधताना आगामी निवडणुकीसाठी ठोस रणनीती आखून दिली आहे. निवडणूक आता केवळ एक वर्षावर येऊन ठेपल्याने कार्यकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी आत्तापासूनच कामाला लागावे, असे आदेश त्यांनी दिले.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे:
* तळागाळापर्यंत पोहचा: केंद्र आणि राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा.
* संघटन मजबुती: पक्षाची खरी ताकद कार्यकर्त्यांमध्ये आहे. ‘बूथ’ स्तरावर पक्ष अधिक मजबूत करा.
* त्रिसूत्रीचा अवलंब: सेवा, संघटन आणि समर्पण या त्रिसूत्रीवर आधारित काम करण्याचे आवाहन.
* लोकसंपर्क: आमदारांनी आपला जनसंपर्क वाढवून लोकांची कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर द्यावा.

या बैठकीला मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, राष्ट्रीय महामंत्री तरुण चुग आणि कोअर कमिटीचे इतर सदस्य उपस्थित होते.

नितीन नबीन यांचा आजचा दौरा आणि कार्यकर्ता मेळावा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माहिती दिली की, नितीन नबीन हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच गोव्यात आले असून त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.

शनिवारी त्यांच्या दौऱ्याचे नियोजन खालीलप्रमाणे असेल:
* सकाळी १०:०० वा: म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा कार्यालयाला भेट.
* सकाळी ११:३० वा: मिरामार येथील दिवंगत मनोहर पर्रीकर आणि भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्मृतीस्थळांना अभिवादन.
* दुपारी ११:४५ वा: ताळगाव येथील कम्युनिटी हॉलमध्ये भव्य कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करणार.

नबीन यांच्या या दौऱ्यामुळे गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, मगोपसोबतची युती निश्चित झाल्याने आगामी निवडणुकीचे चित्र आता अधिक स्पष्ट झाले आहे.

Trending

Exit mobile version