आनंदप्राप्तीसाठी जीवनात साधनेशिवाय पर्याय नाही : सुश्री संगीता नाईक
गोवा खबर : आनंदप्राप्तीसाठी जीवनात साधनेशिवाय पर्याय नाही. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी जलद आनंदप्राप्ती करण्यासाठी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ सांगितली आहे. ‘गुरुकृपायोगानुसार साधने’नुसार कुलदेवतेचा नामजप करणे, तसेच याच्या जोडीला पूर्वजांच्या त्रासापासून रक्षण होण्यासाठी दत्ताचा नामजप करणे आवश्यक आहे. नामजप केल्याने आपल्यामधील दुर्गण, वाईट सवयी आणि अयोग्य संस्कार नष्ट होऊन भगवंताचे दैवी गुण आपल्यामध्ये येत असतात. देवाचे संरक्षण कवचही लाभत असते. अध्यात्म हे कृतीचे शास्त्र असल्याने प्रत्यक्ष कृतीला सर्वाधिक महत्त्व आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सुश्री संगीता नाईक यांनी केले.
सनातन संस्थेच्या वतीने गोळणावाडा, पोंबुर्फा येथे शांतादुर्गा रवळनाथ संस्कृती समिती मंदिर येथे आयोजित ‘आनंदी जीवनासाठी साधना’ याविषयावरील जाहीर प्रवचनात सुश्री संगीता नाईक मार्गदर्शन करत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या,‘‘सनातन संस्था जिज्ञासूंना साधना आणि धर्माचरण करण्यास शिकवणे, तसेच धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापना करणे यांसाठी कटीबद्ध आहे. आगामी आपत्काळाला समर्थपणे सामोरे जाण्यासाठीही साधनेशिवाय पर्याय नाही.’’ सुश्री संगीता नाईक यांनी या वेळी यांनी पुढे हिंदु संस्कृती, जीवनात धर्माचरण करण्ो आणि पुढील पिढी सुसंस्कारीत करण्याचे यांचे महत्त्व विषद केले.
उपस्थित जिज्ञासूंनी प्रवचनानंतर ‘साधना शिकून ती कृतीत आणणे’ यांसाठी साप्ताहिक सत्संग सुरू करण्याची मागणी सनातन संस्थेकडे केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री भास्कर बावणे यांनी, तर आभार प्रदर्शन दयानंद भोसले यांनी केले. हे प्रवचन यशस्वी होण्यासाठी मंदिराचे अध्यक्ष वासुदेव चोपडेकर यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.